ओदिशाचे माजी महाधिवक्ता अशोक मोहंती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच त्यांना सीबीआयने अटक केली. आपल्या पदाचा गैरवापर करणे आणि शारदा घोटाळ्यातील अर्थ तत्त्व समूह कंपन्यांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सीबीआयने स्थापन केलेल्या विशेष पथकाने मोहंती यांची अनेकदा चौकशी केली आणि त्यानंतर मोहंती यांना कटक येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेऊन अटकेत ठेवण्यात आले आहे.
मोहंती यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सीबीआयच्या कार्यालयात आणण्यात आले. देव आणि गुरू आपल्या पाठीशी आहेत, आपण काहीही गैर केलेले नाही, सत्य उजेडात येईलच, असे मोहंती यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर वार्ताहरांना सांगितले.
मोहंती यांनी १३ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी त्यांची सीबीआय चौकशी करण्यात आली. अर्थ तत्त्व समूह कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सेठी यांच्याकडून कटकमध्ये आपल्याला एक आलिशान सदनिका विनामूल्य मिळाली असल्याच्या वृत्ताचे मोहंती यांनी जोरदार खंडन केले.
कटक विकास प्राधिकरणाचा कोटय़वधी रुपये किमतीचा भूखंड मोहंती यांना विनामूल्य देण्यात आला, असा दावा सीबीआयने केला आहे. मात्र मोहंती यांनी त्याचे खंडन केले, यापोटी आपण १.०१ कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे ते म्हणाले.