मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी बुधवारी राजकारणात प्रवेश केला. ओदिशातील बीजू जनता दलात (बीजेडी) पटनायक यांनी प्रवेश केला असून मी बीजू जनता दलात कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला आहे. पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक हे १९७९ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. सप्टेंबर २०१५ ते निवृत्त झाले होते. ते ३६ वर्ष महाराष्ट्रात कार्यरत होते. राष्ट्रपती पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे. पोलीस खात्यात काम केल्यानंतर अरुप पटनायक आता राजकारणात उतरले आहेत.

पटनायक यांनी बुधवारी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत बिजू जनता दलात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अरूप पटनायक यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही राजकारणाय येता त्यावेळी तुमच्यासमोर निवडणूक लढवणं हा पर्याय असतो. जर पक्षाला माझ्यात ती क्षमता दिसली आणि त्यांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले. राजकारणात का आलात असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, पोलीस अधिकारी म्हणून मला माझे काम आवडायचे. मी पोलिसांच्या वर्दीवर मनापासून प्रेम केले. निवृत्तीनंतर कॉर्पोरेट कंपनीत जाणार असा निर्णय घेतलाच होता. काही दिवसांपूर्वी नवीन पटनायक यांनी मला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली. नवीन पटनायक हे स्वच्छ प्रतिमा असलेले आणि एक चांगले नेते असल्याने मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

अरुप पटनायक यांच्यापूर्वी सत्यपाल सिंह यांनी देखील राजकारणात प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.