स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू व तांत्रिक सारथी बाबा याला ओडिशा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात कारवाईची मागणी लोकांनी केली होती व हिंसक निदर्शनेही झाली होती. सुमारे १० तास जाबजबाब घेतल्यानंतर केंद्रपारा जिल्ह्य़ात बारीमुला येथे असलेल्या आश्रमात त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला कटक येथे गुन्हे अन्वेषण शाखेत नेण्यात आले. त्याला अटकेत ठेवण्यात आल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त महासंचालक बी.के.शर्मा यांनी सांगितले. सारथी याच्यावर भादंवि कलम ४२० (फसवणूक), कलम १२० बी (गुन्हेगारी कट), कलम ३४१ (एखाद्याला रोखून धरणे) व अनुसूचित जाती जमाती कायदा व शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
एका दूरचित्रवाणी वाहिनीने दोन दिवसांपूर्वी असे दाखवले की, पत्नीच्या बहाण्याने एक महिला त्याच्यासोबत दोन दिवस हैदराबाद येथील हॉटेलवर राहिली. सारथी याने हा आरोप नाकारला असून दूरचित्रवाणी वाहिनीवर कारवाईचा इशारा दिला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सारथी याच्या आश्रमात काल पोहोचले. तेथे त्यांचे जबाब घेण्यात आले, सगळ्या परिसराची छाननी करण्यात आली. तेथे काही पैसे, चांदी, सोने व इतर साहित्य सापडले. काही बँख खात्यांची माहिती, छायाचित्रे, सीसीटीव्ही चित्रण सापडले आहे त्याची तपासणी करण्यात येत आहे. कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून पोलीस अधीक्षक सतीश गजभिये यांच्या जागी केंद्रपारा येथे नितीनजित सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुन्हे अन्वेषण शाखेला सारथी याच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यास सांगितले आहे. भाजपने न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली असून गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात अजून काही निष्पन्न झाले नाही असे पक्षाचे म्हणणे आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष के.व्ही.सिंगदेव व ज्येष्ठ नेते विजय मोहपात्रा यांनी केंद्रपाराचे माजी पोलीस अधीक्षक गजभिये यांनी निदर्शकांवर बळाचा वापर केल्याने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान जी महिला सारथी याच्याबरोबर हैदराबादमध्ये पत्नीच्या बहाण्याने राहिली होती, ती डॉक्टर असून तिने पोलिसात तक्रार दिली असून आपल्या जीवाला धोका असल्याने पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून या महिलेने तिला ब्लॅकमेल करणाऱ्या चार जणांची नावे सांगितली आहे. हे चारही जण सारथी याच्या आश्रमाशी संबंधित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.