ओडिशा सरकारने राज्यपाल कार्यालयाला पत्र लिहून हरियाणा दौऱ्यावर ४६ लाख रुपये खर्च करण्यासंबंधी स्पष्टीकरण मागितलं आहे. मे महिन्यात राष्ट्रपतींकडून गणेशी लाल यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या अख्त्यारित असणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यपाल कार्यालयाला हे पत्र लिहिलं आहे. पत्रात दोन वेगवेगळ्या मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये दिल्लीला जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या चार्टर्ड जेट आणि गेल्या महिन्यात सिरसा येथे जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचा उल्लेख आहे. पत्रात लिहिल्याप्रमाणे चार्टर्ड जेटसाठी ४१.१८ लाखांचा खर्च आला तर हेलिकॉप्टरसाठी पाच लाखांचा खर्च आला.

पत्रात नमूद करण्यात आलं आहे की, ‘माननीय राज्यपालांसाठी कोणत्या परिस्थिती आणि कारणास्तव हेलिकॉप्टर वापरण्यात आलं. तसंच विमानाच्या मार्गात कोणत्या कारणास्तव बदल करण्यात आला. या सर्वांसाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेण्यात आली होती का ?’. राज्यपालांच्या राज्याबाहेरील दौऱ्यासंबंधी पाळण्यात येणाऱ्या प्रोटोकॉलवर प्रतिक्रिया देण्यासाठी राज भवनात कोणीही उपस्थित नसतं.