ओडिशामधील मायुरभांज जिल्ह्यामध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपली मामी जादूटोणा करते या संशयावरुन एका ३० वर्षीय व्यक्तीने ६० वर्षीय महिलेची हत्या केली. या महिलेचे शीर धडापासून वेगळे करत या व्यक्तीने शीर हातात घेऊन १३ किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस स्थानकामध्ये आत्मसमर्पण केलं. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुद्धूराम सिंग आणि चंपा सिंग हे दोघे एकाच घरात राहत होते. सोमवारी दुपारच्या सुमारास बुद्धूराम आपल्या मामीचं कापलेलं शीर हातात घेऊन कुंथा पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला आणि पोलिसांची एकच धावपळ सुरु झाली. बुद्धूरामने दिलेल्या माहितीनुसार त्यानेच आपल्या मामीची हत्या केली. “माझी मामी जादूटोणा करते आणि त्यामुळेच तीन दिवसापूर्वी माझ्या मुलीचा मृत्यू झाला. याच रागामधून मी तिची हत्या केली आहे,” असं बुद्धूरामने पोलिसांना सांगितलं. बुद्धूराम आणि त्याची मामी नौसाही गावात राहतात. हा भाग आदिवासी प्रदेश म्हणून ओखळला जातो अशी माहिती कुंथा पोलीस स्थानकाचे प्रमुख स्वरानलता मिन्झ यांनी दिली.

बुद्धूरामने ज्या कुऱ्हाडीने मामीची हत्या केली ती कुऱ्हाडही पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेचे धड ताब्यात घेतलं आहे. चंपा या अंगणामध्ये झोपल्या असतानाच बुद्धूरामने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने तिचं शीर धडापासून वेगळं करुन गमच्छामध्ये बांधलं आणि तो पोलिसांकडे आला. हा हल्ला झाला तेव्हा तेथे अनेकजण उपस्थित होते. मात्र कोणीही बुद्धूरामला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

पोलिसांनी बुद्धूरामला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंपा यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ओडीशामध्ये २०१० पासून दरवर्षी जादूटोण्यासंदर्भाती वादातून सरासरी ६० जणांची हत्या होते. अनेकदा ही प्रकरण आदीवासी पाड्यांमधीलच असतात. यावर्षी राज्यात दाखल झालेल्या जादूटोण्यासंदर्भातील हत्या प्रकरणांपैकी १२ प्रकरणे ही मायुरभांजमधील असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.