ओदिशाचा एक व्यक्ती १३५० किमी चालत प्रवास करून दिल्लीला पोहोचला आहे. कारण त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून त्यांना अर्धवट राहिलेल्या आश्वासनाची आठवण करून द्यायची आहे. ओदिशाचा ३० वर्षीय मुक्तिकांत बिस्वल शनिवारी दिल्लीला पोहोचला. मोदींनी राऊरकेला येथे मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. मोदींना भेटून त्यांनी दिलेले आश्वासन त्यांना लक्षात आणून द्यायचे असल्याचे मुक्तिकांत म्हणतो. यासाठी त्याने १३५० किमी पायी प्रवास केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना हे समजताच काँग्रेस पक्ष हे आश्वासन पूर्ण करेन असा विश्वास ट्विटरद्वारे दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींना टोलाही लगावला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधानांनी ३ वर्षांपूर्वी राऊरकेला येथे मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचे वचन दिले होते. आता मुक्तिकांत १३०० किमी चालत दिल्लीला आला आहे. कारण मोदींनी आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही.. लोक मरत आहेत.

मुक्तिकांत हे मूर्तिकार आहेत. त्यांनी हातात तिरंगा घेऊन पायी प्रवास सुरू केला होता. आग्रा महामार्गावर आल्यानंतर ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

ते म्हणाले की, मोदींनी २०१५ मध्ये ओदिशाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी इस्पात जनरल हॉस्पिटलला सुपर स्पेशलिटी करण्याचे आणि ब्राह्मणी पुल उभा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजही त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलेले नाही.

इस्पात जनरल हॉस्पिटल हे राऊरकेलातील लोकांची जीवनरेषा आहे. पण आज त्याची अवस्था वाईट झाली आहे. लोक रोज मरत आहेत. पंतप्रधानांनी चार वर्षांत आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही. पण तरीही मला अपेक्षा आहे की, ते या वर्षी काही तरी करतील, असेही तो म्हणाला.