करोनाच्या संकटाच्या काळात ओडिशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कटक जिल्ह्यातील नरसिंहपूरमधील एका मंदिराच्या पुजाऱ्याने एका तरुणाचं शीर धडापासून वेगळं करीत ते देवीला अर्पण केलं. करोनाचं संकट नष्ट व्हावं यासाठी त्यानं अंधश्रद्धेतून हे अमानवीय कृत्य केलं. पोलिसांनी या पुजाऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नरसिंहपूर बंधहुडा गावात बुधवारी रात्री ब्राह्मणी देवी मंदिराच्या परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त केलं आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. दरम्यान, या मंदिराच्या पुजाऱ्याने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

संसारी ओझा (वय ७२) असं आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधीक्षक राधा विनोद यांनी सांगितलं की, “जुन्या रुढी परंपरांच्या अंधश्रद्धेतून ही घटना घडली आहे. मृत तरुणाची ओळख पटली असून सरोज कुमार प्रधान असं त्याचं नाव आहे. आरोपी पुजाऱ्याच्या मते, मंदिरात बळी देण्यावरुन मृत व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. जेव्हा हा वाद वाढला त्यानंतर पुजाऱ्याने मंदिरातच त्याचं शीर धडापासून वेगळे केलं.

चौकशीदरम्यान, पुजारी ओझानं पोलिसांना सांगितलं की, “आपल्याला देवानं स्वप्नात येऊन आदेश दिला होता की, जर नरबळी दिला तर करोना विषाणूचं संकट थांबेल.” दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानसुार, आरोपी पुजारी आणि मृत व्यक्तीमध्ये बऱ्याच काळापासून आंब्याच्या बागांवरुन वाद सुरु होता.

डीआयजी आशीष कुमार सिंह यांनी म्हटलं, “प्राथमिक चौकशीत हे निष्पन्न झालं आहे की, ही घटना घडली त्यावेळी आरोपी पुजारी दारुच्या नशेत होता. सकाळी ज्यावेळी त्याची नशा उतरली तेव्हा त्याने स्वतःला पोलिसांच्या हवाली केले.” तर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सत्य प्रकाश यांनी म्हटले की, “एकवीसाव्या शतकातही लोक इतके हिंसक कसे का होऊ शकतात. या प्रकरणी आम्ही कडक कारवाईची मागणी करीत आहोत.”