राज्य सरकारमधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्नाटकमधील प्रधान सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीच्या केवळ तीन दिवस आधी ‘शिस्तभंगा’बद्दल सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षा देण्यात आली आहे.
आतापर्यंत कार्मिक व प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष कार्याधिकारी म्हणून नेमणुकीला असलेले आयएएस अधिकारी एम. एन. विजयकुमार यांना सरकारने २७ एप्रिलच्या दुपारपासून निवृत्त केले असून, त्यांना सेवानिवृत्तीचे संपूर्ण फायदे नाकारण्यात आले आहेत.
विजयकुमार यांनी प्रशासनातील भ्रष्ट कारभाराविरुद्ध तक्रारी केल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वरिष्ठांमध्ये अस्वस्थता होती. कार्यकाळात त्यांची अनेकदा बदली करण्यात आली. बेशिस्तीचा आरोप ठेवून त्यांच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता व केंद्र सरकारने तो मंजूर केला, असे मुख्य सचिवांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.