News Flash

काँग्रेसने ट्विट केले पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद ‘मीम’; सर्व स्तरातून टीका

टीका झाल्यानंतर ट्विट हटवले

युथ काँग्रेसच्या 'युवा देश' या नियतकालिकाच्या ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध झालेले वादग्रस्त मीम. टीकेनंतर ते हटवण्यात आले.

गुजरातच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी आता खालची पातळी गाठली आहे. भारतीय युवा काँग्रेसच्या ‘युवा देश’ या ऑनलाईन नियतकालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अपमानास्पद ‘मीम’ तयार करत स्वत:वर संकट ओढवून घेतले. सोशल मीडियातून टीकेचा भडिमार झाल्यानंतर हे वादग्रस्त टि्वट हटवण्यात आले आहे.


काँग्रेसच्या नियतकालिकाने केलेल्या या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या एका एकत्रित छायाचित्रात संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये विरोधीपक्ष आपल्यावर कशापद्धतीचे मेमे बनवतात असे मोदी बोलत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प त्यांना सांगत आहेत. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘तुम्ही चहाच विका’ असे अपमानास्पद बोलत असल्याचे चित्र तयार करण्यात आले आहे. हे चित्र ट्विटरच्या माध्यमांतून व्हायरल करण्यात आल्याने त्यावर नेटकऱ्यांनी टीकेचा भडिमार सुरु केला. त्यानंतर काँग्रेसकडून तातडीने हे ट्विट डिलीट करण्यात आले.

काँग्रेसच्या अधिकृत नियतकालिकेच्या ट्विटर हँडलवरुन हे मीम प्रसिद्ध झाल्याने भाजपचे नेतेही चांगलेच खवळले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस पाठवून देशाच्या प्रमुखाबद्दल अशा अपमानास्पद प्रकाराला परवानगी कशी दिली असा जाब विचारला आहे.

‘या प्रकारामुळे काँग्रेसची गरीबांबाबतची हीन भावना प्रकट होते’ असा हल्लाबोल रुपाणी यांनी केला. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘काँग्रेसच्या विचारांना काय झाले आहे, अशा प्रकारांच्या माध्यमातून त्यांनी राजकीय आत्महत्या करायचे ठरवले आहे का?’ हे खरंच खालच्या पातळीचे ट्विट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या चहा विकण्याचे भांडवल केले आहे. मात्र, यंदा ही टीका खूपच खालच्या पातळीवर पोहोचली. जानेवारी २०१४ मध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर टीका करताना म्हटले होते की, ‘मोदी कधीही पंतप्रधान होणार नाहीत, मात्र काँग्रेस नेत्यांना चहा वाटप करण्यासाठी त्यांचे स्वागत असेल.’ त्यानंतर भाजपने अय्यर यांच्यावर टीका करताना चहाचेच भांडवल करीत ‘चाय पे चर्चा’ हा निवडणूक कार्यक्रम राबवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 9:38 pm

Web Title: official handle of indian youth congress online magazine yuva desh posted derogatory tweet against pm narendra modi
Next Stories
1 ‘नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव ; हिवाळी अधिवेशनाची तारीख फक्त त्यांनाच ठाऊक’
2 नव्या आंदोलनाचा कार्यक्रम लवकरच जाहीर करणार : अण्णा हजारे
3 ‘संसदेबाबत काँग्रेसला वाटू लागलेला आदर आश्चर्यकारक’
Just Now!
X