01 March 2021

News Flash

मोदींचा मुखवटा विकत घ्या, पंतप्रधानांवरील प्रेम व्यक्त करा: भाजपा

नमो अॅप्लिकेशवरुन हा मुखवटा विकत घेता येणार

मोदींचा मुखवटा

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशामध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. असे असतानाच राजकीय पक्ष वेगवेगळ्या माध्यमांमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपाने चक्क मोदींच्या चेहऱ्याचा मुखवटा विकण्यास सुरुवात केली आहे. नमो अॅप्लिकेशवरुन हा मुखवटा विकत घेता येणार आहे.

भाजपाच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन या मुखवट्याच्या विक्रीबद्दलचे ट्विट करण्यात आले आहे. तुमच्यातील मोदी चाहत्याला द्या व्यक्त होण्याची संधी असा मजकूर पोस्ट करत या मुखवट्याच्या विक्रीची लिंक पोस्ट केली आहे. हा मुखवटा २७५ रुपयांना उपलब्ध असून तीन मुखवट्यांचा सेट ६९९ रुपयांना विकत घेता येईल.

नमो अॅपवरुन अशाप्रकारे मोदींचे फोटो आणि स्लोगन असणाऱ्या अनेक गोष्टी विकल्या जातात. यामध्ये कॉफी मग, टी-शर्ट, किचैन्स, टोप्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून मागील तीन महिन्यांमध्ये ५ कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमी नमो अगेन म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत वेगवगेळ्या वस्तू या अॅपवरून विकल्या जात आहेत. ९० दिवसांमध्ये या अॅपवरून १५ लाख ७५ हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नमो अॅपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील महिन्यापासून पेटीएम आणि अॅमेझॉनसारख्या माध्यमातूनही ‘नमो’ ब्रॅण्डच्या वस्तू विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपाच्या काही खासदारांनी ‘नमो हुडी चॅलेंज’च्या नावाने नमो ब्रॅण्डचे हुडी घालून फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे नमो ब्रॅण्डच्या वस्तूंचा खप वाढल्याचे बोलले जात आहे. हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना ‘नमो अगेन’ची टीशर्ट घालून ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत. ही नमो टी-शर्ट नमो अॅपवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहेत. एकूण विक्री झालेल्या वस्तूंपैकी ५० टक्के टी-शर्टस आहेत.

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त नमो ब्रॅण्डच्या वस्तुंवर विशेष सेलअंतर्गत सवलत देण्यात आली होती. या काळामध्ये विकल्या गेलेल्या टी-शर्टमधून एकूण २ कोटी ६४ लाखांची कमाई झाली. टी-शर्टसबरोबरच ५६ लाखांच्या टोप्या, ४३ लाखांचे किचैन्स, ३७ लाखांचे कॉफी मग आणि ३२ लाखांच्या वह्या विकल्या गेल्या. तसेच नमो ब्रॅण्डच्या पेन विक्रीमधून ३८ लाखांची कमाई झाली.

काय सांगते आकडेवारी

एकूण विक्री झालेल्या गोष्टी – १५ लाख ७५ हजार

एकूण कमाई – ५ कोटी २० लाख

टी-शर्टच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – २ कोटी ६४ लाख ७३ हजार ३२१ रुपये

टोप्यांच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ५६ लाख २ हजार ८६५ रुपये

किचैन्सच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ४३ लाख ६ हजार ७३७ रुपये

कॉफी मगच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ३६ लाख ३८ हजार ८१८ रुपये

वह्यांच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ३२ लाख २० हजार ५८३ रुपये

पेनच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ३७ लाख ७३ हजार ८४३ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 12:20 pm

Web Title: official namo masks on sale namo app
Next Stories
1 तेलतुंबडेंविरोधातील कारवाई थांबवा; परदेशी विचारवंतांची भारत सरकारकडे मागणी
2 प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य
3 २०१९ मध्ये मोदी जिंकणार की हरणार?, दलाल स्ट्रीटवरील ‘वॉरेन बफेट’ म्हणतात..
Just Now!
X