बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मिरमध्ये उसळलेले दंगे सुरूच आहेत. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैनिकांच्या २० तुकड्या तातडीने काश्मिरमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत १०० सैनिक आहेत. इथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २००० सैनिकांना काश्मिरमध्ये पाठवण्यात आले आहे. याआधी सीआरपीएफचे २८०० जवान काश्मीर खो-यात पाठवले होते.

तर शनिवारी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक तरूण ठार झाला असून  आतापर्यंत या दंग्यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.  सलग दहाव्या दिवशी देखील काश्मीर खो-यात कर्फ्यु कायम  आहे.

शनिवारी संतप्त जमावाने कुपवाडा जिल्ह्यातील पोलिसांचा तळ पेटवून दिला होता त्यानंतर पोलिसांनी जमावावर गोळीबार केला होता. यात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.

तसेच शनिवारी पोलिसांनी काश्मिरमधून प्रसिद्ध होणा-या वृत्तपत्रांच्या छापखान्यांवर छापे टाकून वृत्तपत्रांच्या प्रती जप्त केल्या होत्या. रविवारीदेखील वृत्तपत्रांवर घातलेली बंदी कायम आहे. १९ जुलैपर्यंत वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली आहे.  वृत्तपत्रातील आक्षेपार्ह माहितीने काश्मिरमधील संघर्ष आणखी चिघळेल म्हणून बंदी घालण्यात आली आहे.

तसेच स्थानिक केबल ऑपरेटरवर देखील प्रसारणासाठी बंदी घातली होती. परंतु पाकिस्तानी आणि दोन खासगी  भारतीय वाहिन्या प्रसारित न करण्याच्या ताकिदीवर हि बंदी उठवण्यात आली. कर्फ्युमुळे काश्मीर खो-यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे २४ जुलैपर्यंत  बंद ठेवण्यात आली आहेत.