नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद याच्याविरोधात पुष्कळ पुरावे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांना उघडे पाडले आहे. सईदला साहेब असे संबोधत त्याच्याविरोधात कुठलाही खटला सुरु नाही, असे अब्बासी यांनी म्हटले होते. २०१८च्या रायसिना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी करझाई नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी ते बोलत होते.


पाकिस्तानचे पंतप्रधान अब्बासी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना खुलेआम हाफिज सईदचे समर्थन केले होते. सईदला त्यांनी साहेब म्हणून संबोधताना सईदवर कुठलाही खटला सुरू नाही, असे सांगितले होते. मात्र, या विधानानंतर अब्बास यांनी आतंरराष्ट्रीय स्तरावर टीकेला समोरे जावे लागले होते. कारण, सईदला जागतिक स्तरावरील दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर १० मिलिअन डॉलरचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी सईदची पाकिस्तानच्या न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केली आहे. तेव्हा पासून तो पाकिस्तानात मुक्तपणे संचार करीत आहे.


सईदच्या सुटकेवर जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त करण्यात आली होती. पाकिस्तानने हाफिज सईदला अभय दिल्याने अमेरिकेने पाकिस्तानची २५५ मिलिअन डॉलरची लष्करी मदत थांबवली होती. पाकिस्तान दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानला लष्करी रसद पुरवण्यावर बंदी आणण्याच्या निर्णयाबाबत करझाई म्हणाले, राजकीय, आर्थिक ताकदीद्वारे ट्रम्प त्यांना हवे ते करु शकतात. दरम्यान, अमेरिकेचे माजी राजदूत झालमय खलिलझाद यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान अब्बास यांच्या सईदविरोधातील विधान ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते.सईद हा जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आहे. २००८मधील मुंबईवरील हल्ल्याचा तो सुत्रधार असून सध्या पाकिस्तानात आहे.