राजस्थानातील कोटामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी ११६ खिळे, लांब वायर आणि लोखंडी छर्रे बाहेर काढले आहेत. या प्रकारामुळे डॉक्टरही काही काळ चक्रावले होते. या वस्तू पोटात कशा गेल्या याबाबत रुग्णाने काहाही माहिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनिल सैनी म्हणाले, भोला शंकर (वय ४२) असे रुग्णाचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पोटात दुखत असल्याने तो रविवारी तपासणीसाठी माझ्याकडे आला होता. यावेळी त्याला मी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. या एक्स रे मध्ये खिळ्यांसारख्या काही वस्तू दिसल्याने मी काही काळ चक्रावून गेलो. त्यानंतर रुग्णाला मी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. यातही हे खिळेच असल्याचे निश्चित झाल्यानंतर सोमवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्याच्या पोटातून ६.५ सेमी लांबीचे ११६ खिळे, एक लांब वायर आणि काही लोखंडी छर्रे बाहेर काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागला.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर आपल्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणावर खिळे कसे काय गेले हे सांगण्याच्या स्थितीत रुग्ण नसल्याने याची माहिती कळू शकलेली नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र, जर हे खिळे रुग्णाच्या आतड्यांमध्ये गेले असते तर मात्र, ही खूपच गंभीर बाब बनली असती त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही निर्माण झाला असता. भोला शंकर हा माळीकाम करतो. मात्र, त्याच्या कुटुंबानेही हे खिळे त्याच्या पोटात कसे गेले हे माहिती नसल्याचे सांगितले आहे.

कोलकात्यात अशीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी रुग्णाच्या पोटातून अडीज सेमी लांबीचे खिळे बाहेर काढण्यात आले होते. तर जुलै २०१७ मध्ये बुंदी येथील रहिवासी असणाऱ्या बद्रीलाल (वय ५६) या व्यक्तीवर फरिदाबाद येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या पोटातून सुमारे १५० सुया आणि खिळे बाहेर काढण्यात आल्या होत्या.