दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सागरी प्रदेशात तेल उत्खनन करण्याच्या चीनच्या कृतीने वातावरण अधिकच चिघळू लागले आहे. यापाश्र्वभूमीवर वादग्रस्त सागरी प्रदेशात सोमवारी व्हिएतनामच्या गस्ती नौका आणि चीनच्या अनेक जहाजांनी एकमेकांवर पाण्याचे जोरदार मारा केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त प्रदेशात चीनने तेल उत्खनन सुरू केल्यानंतर प्रथमच व्हिएतनामने आक्रमक भूमिका घेतल्याचे येथील तुवोई त्रे या वर्तमानपत्राने नमूद केले आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांना दोषी धरले आहे. व्हिएतनामने चिनी जहाजांकडून आपल्या जहाजांवर केल्या जाणाऱ्या पाण्याच्या मारा करीत असल्याचे चित्रण प्रसारित केले आहे. चीनने तेल उत्खनन थांबवावे, अशी विनंती करणारे फलक व्हिएतनामच्या जहाजांवर झळकत असल्याचे वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
तेल उत्खनन होत असलेल्या परिसरात चीनने १६ किमीपर्यंतच्या परिसर आपल्या ताब्यात घेतला असून सुरक्षेसाठी लढाऊ विमाने तैनात केल्याचे वृत्त आणखी एका दैनिकाने तटरक्षक दलाच्या प्रमुखांच्या हवाल्याने दिले. चीनच्या आक्रमकतेविरोधात व्हिएतनाममध्ये जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. रविवारी मोठय़ा संख्येने व्हिएतनामी नागरिकांनी रस्त्यावर येऊन चीनविरोधी घोषणा दिल्या. चीनने वादग्रस्त प्रदेशातील तेल उत्खनन त्वरित थांबवावे, अशी मागणी व्हिएतनामने केली आहे.