पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरी करून काही कागदपत्रे उद्योगांना विकल्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नॉइडा येथे एका पेट्रोकेमिकल कंपनीवर पोलिसांनी छापे टाकले. ऊर्जा सल्लागार प्रयास जैन यांच्या कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला.
आरोपींना शनिवारी न्यायालयात उपस्थित केले असता पाच जणांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यावेळी पोलिसांतर्फे युक्तीवादात असे सांगण्यात आले की, हे हेरगिरीचे गंभीर प्रकरण असून यात कार्यालयानी गोपनीयता भंग केल्याचा आरोप लागू शकतो त्यामुळे जबाबासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी.
ज्युबिलन्ट एनर्जी या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी सुभाष चंद्र यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या समवेत ऊर्जा कंपन्यांच्या चार अधिकाऱ्यांनाही शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांना जैन यांच्या कार्यालयात सकाळी नेण्यात आले.
दिल्ली पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केलेल्या पाच जणांची नावे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शैलेश सक्सेना, इस्सारचे विनय कुमार, केर्न्‍सचे के.के.नाईक, ज्युबिलंट एनर्जीचे सुभाष चंद्र व अडीएजी रिलायन्सचे ऋषी आनंद यांचा समावेश आहे.
 हेरगिरी व कागदपत्रे चोरण्याचा प्रकार किती काळ चालू होता व त्यातून कुणाला फायदा मिळाला याचा शोध घेत असल्याचे बस्सी यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना चोरीची कागदपत्रे मिळाली होती व ती त्यांच्या आस्थापनांवरील छाप्यात जप्त करण्यात आली.
गृहमंत्र्यांचा इशारा
पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात सहभाग असलेल्यांना कोणतीही दयामाया दाखविण्यात येणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे स्पष्ट  केले.
दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लवकरच ते सर्व प्रकरण तडीस नेतील. या प्रकरणात मध्यस्थ आणि सरकारी अधिकारी यांचे लागेबांधे असण्याची शक्यता राजनाथ सिंह यांनी फेटाळली नाही. अन्य मंत्रालयांकडेही तपास वळविण्याचे संकेतही त्यांनी दिले.