येमेनच्या हूथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन तेलप्रकल्पांवर ड्रोन हल्ले केल्याने दोन्ही ठिकाणी तेलउत्पादन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सौदी अरेबियाकडून जगाला होणाऱ्या तेलनिर्यातीत निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.

अरामकोच्या अबाकीक आणि खुराईस तेलप्रकल्पांवर शनिवारी हल्ले  करण्यात आले. यामुळे दोन्ही ठिकाणी तेलउत्पान थांबविण्यात आले असून, उत्पादनात ५० टक्के घट होईल, असे सौदीचे तेलमंत्री अब्दुल्लाझिज बिन सलमान यांनी सांगितले. या हल्ल्यांमुळे ५.७ दशलक्ष पिंप तेलाचे उत्पादन घटले, असे अरामकोने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. या प्रकल्पांतील तेलउत्पादन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत दोन दिवसांत सविस्तर माहिती देण्यात येईल, असे अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासेर यांनी सांगितले. या हल्ल्यामुळे जगाच्या तेलपुरवठय़ावर परिणाम होणार असून पर्शियन आखातातील तणाव आणखी वाढणार आहे. हल्लेखोरांना इराणचे पाठबळ असल्याने मानले जाते. अमेरिका आणि इराण यांच्यात या हल्ल्यांवरून पुन्हा खडाजंगी सुरू झाली. अमेरिकेने या हल्ल्यांना इराणच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. इराणने मात्र हा आरोप फेटाळला आहे.

अरामको कंपनीच्या अबाकिक तेलप्रकल्पातून पर्शियन आखात व तांबडय़ा समुद्रातून इतर ठिकाणी तेल पाठवले जाते. दिवसाला ७० लाख पिंप तेलउत्पादन तेथे होते. खुराईस तेलप्रकल्पातून दिवसाला १० लाख पिंप तेलनिर्मिती होते. त्यांच्याकडे २० अब्ज पिंप राखीव तेलसाठा आहे.

आर्थिक संकटाचा धोका

* सौदी अरेबियाने तेलपुरवठा त्वरित पूर्ववत न केल्यास, खनिज तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिबॅरल १०० डॉलपर्यंत उसळू शकतात, असा विश्लेषकांचा होरा आहे.

* तसे झाल्यास तेल आयातीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसमोर बिकट आर्थिक संकट उद्भवू शकते.

* सध्या हे भाव ६० डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास आहेत. सौदी अरेबिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल पुरवठादार आहे.