एका मॉडेलच्या हत्येप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी ओला कॅब चालकाला अटक केली आहे. ३१ जुलै रोजी ही हत्या करण्यात आली होती. मूळची पश्चिम बंगालची असणारी पूजा सिंह हिने विमातळावर जाण्यासाठी कॅब बूक केली होती. यावेळी चालकाकडून तिची हत्या करण्यात आली. पूजा सिंह मॉडेल तसंच इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. जवळपास एका महिन्यापासून पोलीस हत्येचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आरोपीचा शोध घेत होते. जीन्स, घड्याळाच्या सहाय्याने अखेर त्यांनी आरोपीचा शोध घेतला असून बेड्या ठोकल्या आहेत.

३१ जुलै रोजी पूजा सिंहने खासगीत ओला कॅब बूक केली होती. नेमका याचाच फायदा आरोपी चालक एच एम नागेश याने घेतला. पूजा सिंहने आदल्या दिवशी याच कॅबने प्रवास केला होता. आरोपी नागेशने पूजा सिंहला लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमासाठी पूजा ३० जुलै रोजी बंगळुरुत आली होती. पश्चिम बंगालला पुन्हा परतत असताना तिची हत्या करण्यात आली. पुजावर अनेकदा चाकूने वार करण्यात आले. तिच्या डोक्यावरही जखमेच्या खुणा आढळल्या. इलाकाई गावातील लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना यासंबंधी माहिती दिली होती.

जवळपास एक महिना पोलीस या हत्येचा तपास करत होती. शेवटी पूजाचं टायटन घड्याळ, Jealous 21 जिन्स आणि ब्रॅण्डेड सॅडल्सच्या आधारे त्यांनी हत्येचं कोडं उलगडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजाने विमातळावर जाण्यासाठी कॅब बूक केली होती. यावेळी चालक नागेश दुसऱ्या रस्त्याने तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे त्याने पुजाकडे पैशांची मागणी केली. मात्र तिने देण्यास नकार दिला.

यानंतर नागेशने रॉडने पुजावर हल्ला केला ज्यामुळे ती बेशुद्द पडली. नागेशला पुजाकडे ५०० रुपये आणि दोन मोबाइल फोन मिळाले. यानंतर तो सुटका करुन घेण्याच्या तयारीत होती. पण रस्स्यात पुजाला शुद्ध आली आणि तिने बचाव करण्यासाठी नागेशवर हल्ला केला. यानंतर नागेशने पुजावर चाकूने वार केले आणि डोक्यावर दगडाने हल्ला केला.

पोलिसांना तपासादरम्यान पुजाने हत्येच्या आदल्या दिवशी कॅब बूक केली असल्याचं लक्षात आलं. यामुळे त्यांना नागेशवर संशय आला. चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केली. पोलिसांनी आरोपी नागेशला अटक केली आहे.