ड्रायव्हरशी झालेली बाचाबाची एका प्रवाशाला चांगलीच महागात पडली आहे. हा प्रवासी पोर्ट ब्लेअरहून दिल्ली विमानतळावर आला. त्यानंतर त्याने त्याच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली. ओलाचा कॅब ड्रायव्हर त्याला एअरपोर्टवर घ्यायला आला. तिथे या दोघांमध्ये कारच्या डीकीत सामान ठेवण्यावरून वाद झाला. सामान जास्त असल्याचे कारण देत ड्रायव्हरने ट्रीप कॅन्सल केली. त्यानंतर हा प्रवासी कारच्या बॉनेटवर बसला. ज्यानंतर चिडलेल्या ड्रायव्हरने प्रवासी बॉनेटवर बसलेला असूनही कार ५०० मीटरपर्यंत चालवली. पोलिसांनी कार अडवून ड्रायव्हरला अटक केली. तसेच या घटनेत बॉनेटवर बसलेल्या प्रवाशाला जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. २ एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओला कॅबचा ड्रायव्हर आणि सशस्त्र सीमा दलाच्या कर्मचाऱ्यामध्ये सामान जास्त असल्यावरून वादावादी झाली. कारच्या डीकीत या प्रवाशाचे सामान मावतही नव्हते. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर ड्रायव्हरने येत नाही सांगत ट्रीप रद्द केली. ज्यामुळे रागावलेला हा कर्मचारी कारच्या बॉनेटवर जाऊन बसला आणि ड्रायव्हरला चल म्हणून सांगू लागला. ड्रायव्हरने त्याच अवस्थेत ५०० मीटर कार चालवली. ज्यामुळे या प्रवाशाला काही जखमा झाल्या आहेत. आम्ही प्रवाशाच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला आहे. मी, माझे पती आणि आमची मुले आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. त्यानंतर माझ्या पतीने ओला कॅब बुक केली. मात्र कारच्या डीकीत सामान ठेवण्यावरून ड्रायव्हरने माझ्या पतीशी वाद घातला असे या कर्मचाऱ्याच्या पत्नीने सांगितले आहे.

ओला कार सीएनजीवर चालणारी असल्याने या कारमध्ये सामान ठेवण्यासाठी जागा नव्हती, म्हणून मी सामान जास्त असल्याचे सांगत ट्रीप रद्द केली. मात्र तो प्रवासी त्याचा हट्ट सोडतच नव्हता म्हणून मी तो बॉनेटवर बसलेला असतानाच कार चालवली असे ड्रायव्हरने सांगितल्याचे विमानतळ पोलीस अधिकारी संजय भाटिया यांनी स्पष्ट केले.