ओला कॅब चालकाने मुस्लिम कॉलनीत जाण्यास नकार देत प्रवाशाला अर्ध्या रस्त्यातच उतरवलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशाने वाद घातल्यानंतर चालकाने धमकावलं असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय ओला कॅबकडे यासंबंधी तक्रार केली असता त्यांनी योग्य सहकार्य केलं नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे.

पत्रकार असलेल्या असद अशरफ यांनी बी के दत्त कॉलनी ते जामिया नगरला जाण्यासाठी ओला कॅब बूक केली होती. अशरफ यांचा आरोप आहे की, चालकाने त्यांना जामिया नगरला पोहोचवण्याआधीच रस्त्यात उतरवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने मुस्लिम कॉलनीत जाण्यास नकार दिला. अशरफ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घटना शेअर केली आहे. त्यांनी आरोप केलाय की चालकाने आपल्याला धमकावलं तसंच त्रासही दिला. अशरफ यांनी सांगितल्यानुसार, ओला कॅब चालकाने जामिया नगर मुस्लिम कॉलनी असल्या कारणाने जाण्यासाठी योग्य जागा नसल्याचं म्हटलं. आपण जेव्हा त्याचा विरोध केला तेव्हा त्याने आपली माणसं बोलावण्याची धमकी दिली.

अशरफ यांनी यासंबंधी ओला हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केल्यानंतरही कोणती मदत मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. पहिल्यांदा कॉल रिसीव्ह करण्यात आला, मात्र नंतर कोणीही कॉल घेतला नाही ज्यामुळे तोडगा काढताच आला नाही. ओलाने त्यांचं अॅपही ब्लॉक करुन टाकलं होतं, ज्यामुळे दुसरी कार बूक करणंही त्यांना शक्य झालं नाही. त्यांनी पोलिसांना फोनदेखील केला मात्र तिथूनही मदत मिळाली नाही.

यानंतर अशरफ यांनी काही स्क्रीनशॉट ट्विटरला पोस्ट केले होते. ओला कॅबने त्यांच्या ट्विटला उत्तर देत प्रकरणाची दखल घेत चालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र अशरफ यांनी यानंतरही आपली समस्या सोडवण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. अशरफ यांनी ट्विटरवरुन सांगितलं की, ओलाने दुसरी कॅब पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ती पाठवण्यात आली नाही.