News Flash

जुनी कृषी विपणन पद्धतीही कायम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेत ग्वाही

जुनी कृषी विपणन पद्धतीही कायम!
(संग्रहित छायाचित्र)

 

 

तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकार आणि संसदेला आदर असून, शेतक ऱ्यांना जुनी कृषी विपणन पद्धतीही वापरण्यास खुली आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत दिली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावावर बोलताना पंतप्रधानांनी तीनही कृषी कायद्यांचे समर्थन केले. मात्र, या कायद्यांद्वारे नवी व्यवस्था सक्तीची नसून, फक्त नवे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

या कायद्यांबाबत विरोधक शेतक ऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नव्वद मिनिटांच्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य करताना विरोधकांना लक्ष्य केले. काँग्रेस हा दुभंगलेला व गोंधळलेला पक्ष असून, या पक्षाच्या लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळ्या भूमिका आहेत, असे मोदी म्हणाले.

संसद आणि सरकारला शेतक ऱ्यांबद्दल आदर आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळातील उच्चपदस्थ मंत्री शेतक ऱ्यांशी चर्चेस पुढे येत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना शेतक ऱ्यांविषयी आदर आहे. संसदेत कायदे मंजूर करण्यात आले असले तरी बाजार व्यवस्था चालूच राहणार आहे. किमान हमी भावही कायम राहणार आहेत, याचा पंतप्रधानांनी पुनरूच्चार केला.

आमचे शेतकरी स्वयंपूर्ण झाले पाहिजेत. त्यांना शेतमालाची विक्री करताना स्वातंत्र्य असले पाहिजे. त्या दिशेने काम करण्याची गरज आहे. कृषी हा भारतीय संस्कृतीचा भाग असून, अनेक सण हे सुगीच्या हंगामांशी निगडित आहेत. आम्ही मागितले नव्हते तर का दिले, हा नवाच युक्तिवाद ऐकायला मिळत आहे. हुंडा, तिहेरी तलाक यात कुणीही कायद्यांची मागणी केली नव्हती; पण ते कायदे प्रगत समाजव्यवस्थेसाठी केले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशात बदल घडवले, असे मोदी म्हणाले.

आता आत्मनिर्भर भारत संकल्पना अमलात आणली असून त्यातून जागतिक भल्याचाही विचार केला आहे. भारत देश म्हणून टिकू शकणार नाही अशी भाकिते केली जातात; पण ते चूक असल्याचे आमच्या देशातील जनतेने सिद्ध केले. आता भारत हा जगासाठी आशेचा किरण ठरत आहे, असे मोदी म्हणाले.

करोनाकाळात आरोग्य व अन्य कर्मचाऱ्यांनी अविश्रांतपणे काम केले, त्यांची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की भारताने करोनाची स्थिती उत्तम पद्धतीने हाताळली. करोनायोद्धांमुळे ते शक्य झाले. आभारप्रदर्शक प्रस्तावावर अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतला, ही प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसवर टीका..  तीन कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान भूमिका मांडत असताना काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतली.हा पक्ष दुभंगलेला आणि गोंधळलेला आहे. काँग्रेस पक्ष देशासाठी काहीही चांगले करू शकणार नाही, अशी टीका मोदी यांनी केली.

कृषी क्षेत्रातील बाजार व्यवस्था बंद केली जाणार नाही. किमान हमीभाव पद्धतही कायम राहील. या कायद्यांद्वारे नवी व्यवस्था सक्तीची नसून, फक्त नवे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कायद्यात त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा करण्याची आमची तयारी आहे.

– नरेंद्र मोदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:07 am

Web Title: old agricultural marketing methods also maintained pm modi abn 97
Next Stories
1 Farmer Protest: १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको; आंदोलन आक्रमक करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
2 भारत-चीन सीमारेषेवरुन मोठी बातमी
3 “हे आता जास्त होतंय…”, नरेंद्र मोदींनी सभागृहातच काँग्रेस खासदाराला दिली समज
Just Now!
X