वृद्ध व अपंगांना निवृत्ती वेतन घेण्यासाठी बँकेत जाणे जिकिरीचे असते, त्यामुळे अशा लोकांना घरपोच निवृत्ती वेतन दिले जाणार असून निवृत्तिवेतनाचा देयक आदेश निवृत्तीच्या दिवशीच दिला जाईल, अशी घोषणा सरकारने केली आहे.
निवृत्ती वेतन व निवृत्तिवेतन धारक कल्याण विभागाने निवृत्तिवेतनधारकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही योजना आखली आहे, असे कार्मिक, जन समस्या व निवृत्तिवेतन मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. राज्यांच्या सचिवांशी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितले की, निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची सर्व बाकी रक्कम व निवृत्तिवेतनाचा देयक आदेश निवृत्तीच्याच दिवशी दिला जाईल.
ज्येष्ठ व्यक्तींची कौशल्ये व अनुभवाचा वापरही सरकार करून घेईल. एकतर निवृत्त व्यक्तींची संख्या वाढते आहे व दुसरीकडे वयोमान वाढते आहे. निवृत्तीपूर्वी संस्थेकडून त्यांचे समुपदेशन केले जाईल. तरूण कर्मचाऱ्यांना पुढच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समुपदेशन केले जाईल.
निवृत्तिवेतनासाठी ऑनलाइन योजना
निवृत्ती वेतन अर्जामध्ये सुलभता तर आणली जाईलच; शिवाय ऑनलाइन पेन्शन सँक्शन अँड पेमेंट ट्रॅकिंग सिस्टीम ‘भविष्य’ राबवण्यात येईल. या प्रणालीत पूर्ण पारदर्शकता राहील व निवृत्ती वेतन मंजुरीस विलंब होणार नाही. आपल्या देशात ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी व ३० लाख निवृत्ती वेतनधारक आहेत.