पत्नीच्या हत्येनंतर तिच्या ७५ वर्षीय पतीला ११ दिवसात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील जिल्हा न्यायालयाने हत्या प्रकरणाची सुनावणी ११ दिवसात पू्र्ण केली आहे. एखाद्या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात हा सर्वात कमी वेळ आहे. ६५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या ७५ वर्षीय पतीने कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यातील वळसे गावात तिची हत्या केली. हत्येनंतर ६ तासातच आरोपीला अटक करण्यात आली.

७५ वर्षांच्या चेन्नबसय्याने त्याची पत्नी पुतम्माची हत्या केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यात असलेले वळसे गावात २७ जूनला ही घटना घडली होती. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चेन्नबसय्याने सुरूवातीला हत्या केली नसल्याचे म्हटले होते. पण पोलिसांच्या चौकशीत त्याने चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची कबुली दिली. घटनेच्या दोनच दिवसांनी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. फॉरेन्सिक विभागाने कोर्टात आपला अहवाल सादर केला. त्यानंतर ११ दिवसात कोर्टाने निर्णय दिला.

आरोपी चेन्नबसय्याचा मुलगा गिरीश याने पोलिसांना या प्रकरणात मोलाचे सहकार्य केले. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक श्रीनाथ जोशी यांनी माहिती दिली की कर्नाटक मध्ये पहिल्यांदाच दोषी माणसाला ११ दिवसात शिक्षा सुनावण्यात आली. गिरीशने पोलिसांना सांगितले होते की, वडिल आईला बऱ्याचदा मारहाण करायचे. तसेच त्या दोघांची बऱ्याचदा भांडणे व्हायची. गावातील काही लोकांसोबत आईचे प्रेमसंबंध आहेत असा संशय वडिलांना होता आणि या संशयातूनच वडिलांनी आईची हत्या केली असावी असे मुलगा गिरीश याने पोलिसांना दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.