सध्या इंटरनेटवर चर्चा आहे ती रशीयामधील एका १७ वर्षीय तरुणीचा. आंदोलनातील सर्वात शक्तीशाली फोटो म्हणून अनेकांनी या मुलीचा फोटो शेअर केला आहे. रशियामधील मस्को शहरातील आंदोलनादरम्यानचा हा फोटो आहे. ही मुलगी रस्त्यावर बसून रशियाची राज्यघटना वाचत असून तिच्या सर्व बाजूने मॉस्कोमधील दंगलविरोधी पथकातील पोलिसांचा पाहरा असल्याचे दिसत आहे. पण ही मुलगी कोण आहे? तिच्या आजूबाला पोलीस का आहेत? हे आंदोलन का सुरु आहे असे अनेक प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहेत.

‘इंडिपेंडट’ने दिलेल्या वृत्तानुसार फोटो दिसणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे नाव ओल्गा मिसिक असे आहे. २७ जुलै रोजी झालेल्या आंदोलनामध्ये पोलीस आजूबाजूला असताना ही मुलगी रशियाचे राज्यघटना वाचून दाखवत आहे. मी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असून तुमच्या हत्यारांना मी घाबरत नाही असचं ओल्गा पोलिसांना सांगत आहे. हा फोटो जगभरामध्ये व्हायरल झाला आहे. या फोटोची तुलना अनेकांनी चीनमधील तिआनानमेन चौक नरसंहाराच्या वेळीस समोर आलेल्या फोटोशी केली आहे. एका बलदंड रणगाडय़ासमोर नि:शस्त्र उभे राहून लष्करास आव्हान देऊ पाहणारा तरुण अनेकांना आठवला.

ओल्गाने स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रसंगाबद्दल माहिती दिली. ‘आम्ही शांततेत आंदोलन करत असून आमच्याकडे कोणतेही शस्त्र नाही असं मी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. मी जमीनीवर बसले आणि रशियन राज्यघटनेतील नागरिकांचे अधिकार पोलिसांना वाचून दाखवू लागले. राज्यघटनेत जे लिहीले आहे त्याच्या उलट पद्धतीने पोलीस वागत होते. ते बेकायदेशीर होते,’ असे मत ओल्गाने व्यक्त केले.

आपण शांततेच्या मार्गाने अन्यायाशी लढायला हवे असं मतही ओल्गाने व्यक्त केले. ‘अन्याय झाला की लोकांना आपल्या अधिकारांबद्दल काळजी वाटू लागते. केवळ स्वतंत्र निवडणुक घ्यावी किंवा उमेदवारांना निवडणुकीत भाग घेऊ द्यावा या मागण्यांसाठी ही आंदोलने होत आहेत असं वाटतं असेल तर तो मुर्खपणा आहे. हे आंदोलन राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे. कोणत्याही लोकशाही देशामध्ये प्रश्न विचारायलाच हवेत,’ असं ओल्गा म्हणते. ‘पोलिसांनी मला ते कोण आहेत, मी कोणता अपराध केला आहे याची कोणतीच माहिती दिली नाही. आम्ही घोळक्याने आलेलो नव्हतो किंवा गोंधळही घालत नव्हतो. तरी पोलिसांनी माझे हात-पाय पकडून मला खेचले. मला खरचटल्याने मी मोठ्याने ओरडले. तेव्हा आम्ही काय करत आहोत हे आम्हाला ठाऊक आहे असं पोलिसांनी मला सांगितलं’ अशी माहिती ओल्गाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

ओल्गाला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले. पोलिसांनी परवाणगी दिलेली नसतानाही आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या प्रकरणी पुढील महिन्यामध्ये न्यायलयात सुनावणी होणार असून तिला त्यासाठी हजर रहावे लागणार आहे.

का सुरु आहेत रशियामध्ये आंदोलने

येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मॉस्को शहरामध्ये निवडणुका होणार आहेत. सरकारने अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहण्यास परवाणगी नाकारली आहे. उमेदवार अपात्र असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सरकार चुकीचे आरोप करत असून आम्ही सत्तेला आव्हान देत असल्याने आम्हाला निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

रशियामधील प्रमुख विरोधी पक्ष नेते एलेक्सी नेवेलनी यांनी निवडणुक अधिकाऱ्यांना एका आठवड्याचा वेळ दिला होता. या काळामध्ये अर्ज बाद करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची परवाणगी द्यावी अशी मागणी केली होती. सरकारने परवाणगी दिली नाही तर २७ जुलैला रस्त्यावर उतरून आंदोलनासाठी एकत्र व्हा असं नेवेलनी म्हणाले होते. त्यानुसार २७ तारखेला हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. पोलिसांची परवाणगी नसताना हे आंदोलन केल्याने पोलिसांनी हजारो आंदोलकांना अटक केली. या आंदोलनामद्ये नेवेलानी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनातील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी वापरलेल्या रसायनामुळे नेवेलानी यांनी त्रास झाला आहे.

काय होता तिआनानमेन चौकातील फोटो


४ जून १९८९ या दिवशी या चौकातील लाखो निदर्शकांवर रणगाडे घातले गेले. चिनी सरकारने अत्यंत निर्घृणपणे हे आंदोलन मोडून काढले. २५०० हून अधिकांचे प्राण गेले. त्याआधी जवळपास तीन वर्षे चिनी जनतेत खदखद होती. १९८९ च्या एप्रिल महिन्यात त्यास तोंड फुटले. तिआनानमेन चौकात ४ जून या दिवशी सरकारने बळाच्या जोरावर ते मोडून काढले. अमानुष हिंसा झाली. एका बलदंड रणगाडय़ासमोर नि:शस्त्र उभे राहून लष्करास आव्हान देऊ पाहणारा तरुण हे तिआनानमेनचे दृश्य जागतिक पातळीवर लोकशाहीचे प्रतीक बनले. यानंतर चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर धरपकड झाली. लोकशाही प्रेरणा घाऊकपणे चिरडल्या गेल्या. सत्ताधारी साम्यवादी पक्षातही मोठय़ा प्रमाणावर फेरबदल झाले. तिआनानमेन घडेपर्यंत चिनी प्रसारमाध्यमांना काही प्रमाणात स्वातंत्र्य होते. निदान तसे भासवले तरी जात होते असे म्हणता येईल. तिआनानमेन घडले आणि होते-नव्हते ते स्वातंत्र्यदेखील नाहीसे झाले. या घटनेनंतर केवळ चीनच नाही, तर जगदेखील बदलले. एक नवी साम्यवादी भांडवलशाही जन्मास आलीच. पण अर्थकारणातून हुकूमशाही असा एक नवाच प्रकार उदयास आला.