16 December 2017

News Flash

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला पिता-पुत्रांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) नेते ओमप्रकाश

नवी दिल्ली | Updated: January 23, 2013 2:17 AM

शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) नेते ओमप्रकाश चौताला आणि त्यांचे पुत्र अजय यांना आज (मंगळवार) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली. त्याचबरोबर इतर तीन प्रमुख आरोपी संजीव कुमार, विद्या दातार आणि शेर सिंग बादशमी यांनासुध्दा याच प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे.
तेरा वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात हरयाणाचे पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे सर्वेसर्वा ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे आमदारपुत्र अजय चौटाला यांच्यासह ५५ जणांना मागील आठवड्याच दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते. ओमप्रकाश चौटाला आणि पुत्र अजय चौटाला यांना तात्काळ अटक करून त्यांची २२ जानेवारीपर्यंत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज त्यांना १० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याच्या निकालामुळे हरयाणात राजकीय भूकंप घडला असून चौटाला आणि त्यांच्या पक्षाच्या भवितव्यापुढे मोठेच प्रश्नचिन्ह लागले आहे.

३२०८ शिक्षकांची मनमानी भरती
हरयाणात १९९९-२००० मध्ये ओमप्रकाश चौटाला यांची सत्ता असताना हा घोटाळा झाला होता. चौटाला पितापुत्रांनी सत्तेचा दुरुपयोग करीत मूळ गुणवत्ता यादी डावलून लाच घेऊन ३२०८ कनिष्ठ शिक्षकांची मनमानी पद्धतीने भरती केल्याचा आरोप होता. तत्कालिन प्राथमिक शिक्षण संचालक संजीव कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवड करण्यात आलेल्या शिक्षकांच्या यादीत फेरबदल करण्यासाठी चौटाला दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात दोषींमध्ये संजीव कुमार यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

First Published on January 23, 2013 2:17 am

Web Title: om prakash chautala son ajay sentenced to 10 year jail term in teachers recruitment scam