लंडन : ओमानच्या जोखा अलहार्थी या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या अरबी लेखिका ठरल्या आहेत. त्यांच्या ‘सेलेस्टियल बॉडीज’  या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला असून ओमान या त्यांच्या मूळ देशात  वसाहतवादानंतर झालेली स्थित्यंतरे त्यांनी या पुस्तकात चितारली आहेत.

संपन्न अशा अरब संस्कृतीला एक नवी खिडकी खुली झाली आहे, अशी प्रतिक्रिया अलहार्थी (वय ४० ) यांनी लंडनमध्ये राउंड हाउस येथे आयोजित कार्यक्रमात मंगळवारी व्यक्त केली.

अलहार्थी यांनी यापूर्वीही दोन  लघु कादंबऱ्या, मुलांची पुस्तके व तीन अरबी कादंबऱ्या लिहिल्या आहेत.त्यांनी अभिजात अरबी कवितांचा अभ्यास एडिंबर्ग विद्यापीठात केला असून त्या मस्कत येथील सुलतान काबूस विद्यापीठात शिकवतात. त्या म्हणाल्या की, ओमानने मला प्रेरणा दिली असून आंतरराष्ट्रीय वाचकांनाही या पुस्तकातील स्वातंत्र्य व प्रेम या मानवी मूल्यांचे महत्त्व वाटल्याशिवाय राहणार नाही. पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार असून तो लेखक व भाषांतरकार यांच्यात वाटला जातो. अलहार्थी यांच्या पुस्तकाचे भाषांतर अमेरिकी विद्वान मर्लिन बूथ यांनी केले असून त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात अरबी  साहित्य शिकवतात.  ‘दी गार्डियन’ने म्हटले आहे की, पाश्चिमात्य जगाला पुसटशीही ओळख नसलेली अरबी संस्कृती यातून उलगडत जाते. दी नॅशनलने म्हटले आहे की, यातून एक वेगळ्या बाजाची साहित्य प्रतिभा सामोर येत आहे. पुस्तकातील कथेची वीण अतिशय घट्ट, खोल आहे. फ्रान्सच्या अ‍ॅनी अरनॉक्स. जर्मनीच्या मॅरियॉन पॉशमन, पोलंडच्या ओल्गा टोकरझुक, कोलंबियाच्या जुआन गॅब्रियल वास्कवेझ, चिलीच्या अलिया ट्राबुको झेरान यांची पुस्तके स्पर्धेत होती.

गावातील सामाजिक स्थित्यंतराची कथा 

परीक्षकांनी सांगितले की, ‘सेलेस्टियल बॉडीज’ हे पुस्तक हे स्थित्यंतरातील काव्यात्म आंतरदृष्टीला साद घालतानाच एक वेगळी कल्पनाशक्ती घेऊन येते. ओमानमधील अल अवाफी या गावात या पुस्तकातील कथा घडते. त्यात प्रेमभंगानंतर अब्दल्लाशी विवाह करणारी मय्या, कर्तव्यभावनेतून विवाहबद्ध होणारी अस्मा, कॅनडात गेलेल्या आपल्या प्रियकराच्या प्रतीक्षेतील खावला अशा तिघी आपल्याला सामोऱ्या येतात. या तिघी जणी गुलाम बाळगणाऱ्या पारंपरिक समाजापासून आजपर्यंत झालेली ओमानमधील सामाजिक स्थित्यंतरे त्यांच्या नजरेतून पाहतात. यात गुलामगिरीचा मुद्दा हाताळताना साहित्यातून संवाद साधला आहे. अतिशय समर्पक मांडणी यात आहे.