जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारला अग्रक्रम ठरवता आले नाहीत व त्यांनी काही कृती न करता राज्यातील स्थिती सुरळीत करण्याचे नुसते आवाहन करण्यात धन्यता मानली अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. १९३१ मधील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनाचा उल्लेख करून ओमर यांनी ट्विटरवर लिहिले आहे की,  भाजप व पीडीपी सरकारने पोलिसांच्या गाडय़ांमधून लोकांना कार्यक्रमासाठी आणून राज्यात परिस्थिती सुरळीत झाल्याचा देखावा निर्माण केला. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी असे सांगितले की, आताच्या हिंसाचारात किमान ३० लोक ठार झाले असून मेहबूबा व त्यांच्या पक्षाने पक्षाचे झेंडे व पोलिसांचा वापर करून लोकांना कार्यक्रम स्थळी आणले. दिल्लीतील वरिष्ठांना मूर्खात काढण्याचा प्रकार त्यांनी केला असून वस्तुस्थिती वेगळी आहे. सरकारने अशी नौटंकी करण्यापेक्षा राज्यात शांतता निर्माण करायला पाहिजे होती. डॉक्टर लोक १२०० जखमींवर उपचार करीत आहेत त्यांना मदत करायची गरज आहे. राज्य सरकार निर्लज्ज आहे त्यांनी काही केले नाही. निदान पंतप्रधान मोदी यांनी तरी काश्मीर खोऱ्यात जखमींवर उपचारांसाठी डॉक्टर पाठवायला हवेत. केरळातील आगीनंतर तुम्ही विशेषज्ञांना घेऊन खास विमानाने तेथे गेलात मग आता काश्मीरच्या जखमेवर फुकंर कोण घालणार, असा सवाल त्यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे. ज्या युवकांनी सरकारविरोधी निदर्शने केली त्यांनीही उपचारांना विरोध करता कामा नये.