जम्मू-काश्मीरमधली नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. काश्मीर खोऱ्यात तणाव असून जनतेच्या मनात भितीचे वातावरण आहे. सरकारने घाबरण्याची आवश्यकता नाही असे निवदेन जारी करावे अशी मागणी ओमर अब्दुल्लाह यांनी केली आहे.

सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडतं आहे त्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो तेव्हा ते काहीतरी घडतं असल्याचे सांगतात. पण नेमके काय सुरु आहे ते कोणालाच माहित नाही असे नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्लाह म्हणाले. सोमवारी संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर अमरनाथ यात्रा का थांबवण्यात आली ? पर्यटकांना राज्याबाहेर जाण्यास का सांगण्यात आले? ते केंद्र सरकारने स्पष्ट करावे. लोकांनी घाबरण्याची गरज नाही हे आम्हाला संसदेकडून ऐकायचे आहे असे ओमर अब्दुल्लाह म्हणाले.

शुक्रवारच्या आदेशानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवण्यासाठी पेट्रोल पंप आणि किराणा दुकानांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. त्यात सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना लवकरात लवकर काश्मीर सोडण्यास सांगितले. हे यापूर्वी कधी घडले नव्हते. पर्यटकांवर कधीही हल्ला झालेला नाही असे ओमर अब्दुल्लाह म्हणाले.

कलम ३५ अ किंवा ३७० संदर्भात काही आहे का? असा प्रश्न आम्ही राज्यपालांना विचारला त्यावर सरकारसमोर असा काही विषय नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं. काश्मीरमध्ये सैन्य संख्या वाढवली असली तरी कुठलीही घोषणा करण्याची ही तयारी नाही असे राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिल्याचे ओमर अब्दुल्लाह म्हणाले. आम्ही रस्त्यावर यावे असे एका गटाला वाटत आहे. पण आपल्याला शांत राहून कृती करायची आहे. आपण राजकीय आणि कायदेशीर दृष्टया लढू. लोकांनी संयम राखावा असे आवाहन ओमर अब्दुल्लाह यांनी केले.