जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती यांची टीका

लोकसभा निवडणुकांमुळे सरकारने पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला असावा, अशी टीका जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती यांनी केली  आहे.

पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला होता, पण फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानने या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने हा बहिष्कार टाकण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते. एकीकडे पंतप्रधान पाकिस्तानला राष्ट्रीय दिनाचा शुभेच्छा संदेश पाठवतात व दुसरीकडे पाकिस्तान उच्चायुक्तालयाने आयोजित कार्यक्रमावर बहिष्कार टाकून त्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस छळतात, हे दुटप्पी धोरण हे निवडणुकांवर डोळा ठेवून आखलेले असून देशांतर्गत राजकारणात कुरघोडी करण्याकरिता असे केले जात असल्याची टीका मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, भाजपप्रणीत सरकारने २०१५ ते २०१८ या काळात पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमास प्रतिनिधी पाठवण्यात कुठलीच अडचण आली नाही ती यावेळीच का आली कारण लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाची ही खेळी आहे. मोदी सरकार व भाजप सरकारने २०१५ ते २०१८ या सर्व वर्षी प्रतिनिधी पाठवला होता व याच वर्षी पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. इतर निमंत्रितांना तेथे जाण्यास परावृत्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. एकीकडे आपण पाकिस्तानला भारतकेंद्री प्रचार करण्याबाबत दोष देतो पण आपणही आता पाकिस्तानकेंद्री राजकारण करीत आहोत. जर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे समपदस्थ इमरान खान यांना संदेश पाठवला नसता तर पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंधांबाबत गैरसमज निर्माण झाले असते. मोदी यांनी इमरान यांना पाकिस्तान दिनानिमित्त शुभेच्छा जेणारे पत्र पाठवले आहे. जर पंतप्रधानांनी इमरान यांना शुभेच्छा पाठवताना पूर्वीचे संकेत पाळले असे म्हणायचे तर मग पाकिस्तान दिनाच्या दिल्लीतील कार्यक्रमास मंत्री पाठवण्याची परंपरा आहे ती मात्र पाळण्यात आली नाही. उलट काही पत्रकारांना तेथे पाठवून निमंत्रितांना तेथून हाकलवून देण्याची व्यवस्था करण्यात आली. अशा दोन टोकांच्या परंपरा आपण निवडक पद्धतीने कशा राबवू शकतो अशी टीका अब्दुल्ला यांनी केली आहे.

भारतासमवेत शांततेचे संबंध ठेवण्याची इच्छा-अल्वी

भारतासमवेत शांततेचे संबंध ठेवण्याची पकिस्तानची इच्छा आहे आणि दोन्ही देशांनी मिळून आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी व्यक्त केले आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आपल्या लष्कराचे सामथ्र्य दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संचलनाच्या वेळी अल्वी यांनी वरील मत व्यक्त केले. आमचा युद्धावर विश्वास नाही, चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याची आमची इच्छा आहे, युद्धाऐवजी आपण आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रांवर प्रकाशझोत टाकला पाहिजे, असे अल्वी म्हणाले. पाकिस्तान दिनाच्या संचलनाची सलामी स्वीकारताना त्यांनी सांगितले की, १९४० मध्ये अखिल भारतीय मुस्लीम लीगने लाहोर येथे पहिल्यांदा मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली होती त्यामुळे हा दिन साजरा करण्यात येतो.

पाकिस्तानने शांततेसाठी दाखवलेली इच्छाशक्ती हा आमचा कमजोरपणा समजू नका. पाकिस्तानने अलीकडे संरक्षण सिद्धता दाखवून दिली आहे. आम्ही शांततेचा पुरस्कार करीत असलो तरी देशाचे संरक्षण करण्यात कसूर करणार नाही, असे अल्वी म्हणाले. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महंमद हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महंमद हे प्रमुख पाहुणे होते.

पंतप्रधान इमरान खान, संरक्षण मंत्री परवेझ खट्टक, लष्कराच्या तीन सेवांच्या समितीचे प्रमुख जनरल झुबेर मेहमूद हयात, लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा, नौदल प्रमुख जफर मेहमूद अब्बासी, हवाई दल प्रमुख मुजाहिद अन्वर खान हे यावेळी उपस्थित होते. अझरबैजान, सौदी अरेबिया, तुर्की, चीन, बहारेन, श्रीलंका या देशांची लढाऊ विमाने, पॅराट्रपर यांनी यावेळी भाग घेतला. शाहपीर व बुराक या ड्रोन विमानांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. पाकिस्तानची नस्र, बाबर, शाहीन १, घौरी, शाहीन १११ या क्षेपणास्त्रांसह रणगाडे यात सहभागी होते.

‘फाळणीपूर्व दृष्टिकोनातून बघू नये’

भारत जर पाकिस्तानकडे पूर्वीच्याच फाळणीपूर्व दृष्टिकोनातून बघत असेल तर तो मोठी चूक करीत आहे. शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा ही आमची कमजोरी आहे, असा गैरसमज करून घेऊ नये असा इशारा पाकिस्तानचे अध्यक्ष अरीफ अल्वी यांनी शनिवारी इस्लामाबाद येथे राष्ट्रीय दिनानिमित्त दिला आहे. पाकिस्तानचे वास्तव भारताने स्वीकारले पाहिजे व संवादाच्या मार्गाने पुढे गेले पाहिजे, असे ते म्हणाले. भारताच्या आक्रमणास जशास तसे उत्तर देणे हे पाकिस्तानचे कर्तव्यच आहे त्यानुसारच आम्ही उत्तम डावपेचांनी अलीकडे प्रत्युत्तर दिले, असे अल्वी यांनी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हवाई दलाचे जेट विमान पाडल्याचा उल्लेख न करता सांगितले. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात ४० जण शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे जैशच्या छावणीवर हल्ले केले, तर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसून लष्करी आस्थापनांवर हल्ले केले होते. अल्वी यांनी सांगितले की, भारताने जे कृत्य केले त्यामुळे या भागातील शांतता धोक्यात आली. फाळणीपूर्वीच्या जुनाट दृष्टिकोनातून भारताने आमच्याकडे पाहू नये कारण तसे केल्यास या भागातील स्थिरताच धोक्यात येईल.