नागरिकांवर असलेला ‘लक्षणीय प्रभाव’ हे कारण माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) स्थानबद्ध करण्याच्या समर्थनार्थ देण्यात आले आहे. तसेच  पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची फुटीरतावाद्यांना सहानुभूती असल्याने त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई  करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे.

पोलिसांनी ओमर अब्दुल्ला यांच्याविरुद्ध पीएसएअन्वये कारवाईसाठी तयार केलेल्या फाईलमध्ये ओमर यांचा नागरिकांवर असलेला प्रभाव त्यातून त्यांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद याचा उल्लेख आहे. ओमर यांनी अनुच्छेद ३७० व ३५ ए रद्द करण्याच्या विरोधात सामान्य लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

याच निर्णयाविरुद्ध लोकांना चिथावणी देण्यासाठी समाजमाध्यमांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता होती, असेही नमूद करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद ३७० केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्टला रद्द केल्यापासून ओमर व मेहबूबा हे दोघेही प्रतिबंधक स्थानबद्धतेत आहेत.