भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमने विविध टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. आता या मोहिमेच्या महत्वाच्या आणि अवघड टप्प्याला सुरुवात झाली असून आजच यानाने चंद्राच्या कक्षेतही प्रवेश केला आहे. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.५५ वाजता हे यान चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सिवन म्हणाले, आज यानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी या मोहिमेतील अत्यंत महत्वाची घटना घडेल ती म्हणजे यानाचे लँडर हे चंद्राच्या कक्षेपासून वेगळे होईल. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी चंद्राच्या कक्षेतून बाहेर पडलेल्या लँडरची यंत्रणा सामान्यपणे सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी सुमारे ३ सेकंदाची एक छोटीशी घडामोड केली जाईल.

चांद्रयान-२ ने आज एक महत्वाचा टप्पा पार केला. सकाळी ९ वाजता यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्यानंतर ३० मिनिटांसाठी चांद्रयान-२ चंद्राच्या निश्चित कक्षेत स्थिरावले.

यापूर्वी यानाची सर्व सिस्टिम व्यवस्थित सुरु असल्याचे १४ ऑगस्टला इस्त्रोकडून सांगण्यात आले. भारताची ही दुसरी चांद्र मोहिम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील अद्याप माहिती नसलेल्या गोष्टी शोधून काढण्याचे हा या मोहिमेचा उद्देश आहे.