भविष्यात आक्रमक लष्करी कारवाईसाठी आपण ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) टेक्नोलॉजीचा वापर करु शकतो, हे भारताने शुक्रवारी पहिल्यांदाच दाखवून दिले. ‘आर्मी डे’ च्या निमित्ताने भारतीय लष्कराने या तंत्रज्ञानाची चुणूक दाखवली. ड्रोन स्वार्म म्हणजे झुंडीच्या स्वरुपात पाठवलेली ड्रोन्स. ही ड्रोन्स शत्रूचे हवाई सुरक्षा कवच नष्ट करु शकतात.

ड्रोन स्वार्म हे भविष्यातील युद्धाचे अत्यंत अचूक आणि घातक शस्त्र आहे. ड्रोन स्वार्म तंत्राने तुम्ही शत्रूचे रणगाडे, रडार, हेलिपॅड, इंधन डेपो आणि दहशतवादी तळ नष्ट करु शकतात. भारतीय सैन्याने सुद्धा आता या युद्ध कलेत स्वत:ला पारंगत केले आहे. दिल्ली कॅन्टॉनमेंटमध्ये शुक्रवारी ‘आर्मी डे’ परडेच्या निमित्ताने ड्रोन स्वार्म टेक्नोलॉजी दाखवण्यात आली. यावेळी ७५ छोटया आणि मध्यम आकाराच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आला.

हल्ल्याच्या बरोबरीने मानवी हस्तक्षेपाशिवाय सीमेवरील जवानांना आवश्यक मदत साहित्य सुद्धा ड्रोन स्वार्मने पोहोचवता येऊ शकते. दिल्ली कॅन्टॉनमेंटमध्ये जेव्हा या ड्रोन स्वार्मने उड्डाण केले, तेव्हा लांबून पक्ष्यांचा थवा उड्डाण करतोय, असेच वाटत होते. हे स्वयंचलित ड्रोन्स मानवी हस्तक्षेपाशिवाय शत्रूच्या प्रदेशात ५० किलोमीटर आतपर्यंत घुसून लक्ष्यभेद करु शकतात तसेच या ड्रोन्सचे संचालन करणाराही पूर्णपणे सुरक्षित असेल, असे या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणाऱ्या प्रेजेंटरने सांगितले.

मागच्यावर्षी झालेल्या आर्मेनिया आणि अझरबैझानमधील युद्धात ड्रोन विमानांचे हल्ले निर्णायक ठरले होते. सीमेवर भारतासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या चीनकडे सशस्त्र ड्रोन्स आहेत. हे तंत्रज्ञान ते आता पाकिस्तानालही देणार आहेत. त्यामुळे भारताने आता ‘चीता’ प्रकल्पाला गती दिली आहे. या प्रकल्पातंर्गत इस्रायली बनावटीच्या हेरॉन ड्रोन्सना लेझर गाइडेड बॉम्बने सुसज्ज करण्यात येणार आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र तसेच अचूकतेने वार करणाऱ्या अन्य शस्त्रांनी हेरॉन ड्रोनला अधिक घातक बनवलं जाईल. हा एकूण ३,५०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.