पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामांची 3D प्रतिमा

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. असं असतानाच या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. सर्व राम भक्तांना ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण यज्ञा’मध्ये सहभागी होण्याची संधी योग्यवेळी दिली जाईल असंही ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. अयोध्या रिचर्स इन्स्टीट्यूटचे निर्देशक व्हाय. पी. सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पोस्टाचे विशेष तिकीट प्रकाशित केलं जाणार आहे.

“सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालं तर पाच ऑगस्ट रोजीच पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं जाईल. यापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक प्रतिकृती असणारं असेल तर दुसऱ्यावर इतर देशांमध्ये रामाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी असतील,” असं सिंग यांनी सांगितलं आहे. अयोध्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून रामलीलेसंदर्भातील काही विशेष पोस्टर आणि कटआऊट्स बनवले जात आहेत. जगभरामध्ये प्रभू रामाचा वेगवगेळ्या संस्कृतींमध्ये असणारा प्रभाव या पोस्टर आणि कटआऊट्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हे हे पोस्टर आणि कटआऊट्स ठेवले जाणार आहेत.

नक्की पाहा खास फोटो >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर हे साकेत डिग्री कॉलेजच्या मैदानामध्ये उतरणार आहे. तेथून पाच ते पाच किमी अंतरावर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. या सर्व मार्गावर राम चरित्र मानसमधील श्लोक ऐकू येतील अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितलं आहे. अयोध्येमधील भिंती आणि खांबांवर प्रभू राम आणि रामायणातील प्रसंगांची चित्रे काढण्यात आली आहेत.

नक्की वाचा >> अयोध्या : भूमिपूजन सोहळ्याआधीच करोनाचे विघ्न; मुख्य पुजाऱ्यासहीत १६ पोलिसांना करोनाची लागण

करोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी राम भक्तांनी गर्दी करु नये असे आवाहन राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने केलं आहे. १९८४ पासून आतापर्यंत अनेक कोटी राम भक्तांनी या कामासाठी सहकार्य केलं आहे. त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा नक्कीच असणार. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य होणार नाही, असं ट्र्स्टचे सचिव असणाऱ्या चंपत राय यांनी म्हटलं आहे. तसेच अयोध्येमध्ये येण्याऐवजी घरुनच दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण पाहून संध्याकाळी आपल्या राहत्या घरामध्ये दिपोत्सव करुन आनंद साजरा करावा असं आवाहन राय यांनी राम भक्तांना केलं आहे.