News Flash

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजपवर काँग्रेसचा कायदेशीर कारवाईचा इशारा

काँग्रेसच्या अभिषेक सिंघवींच्या पत्नीचे नीरव मोदीच्या कंपनीत समभाग : भाजप

काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी (संग्रहित छायाचित्र)

माझे कुटुंबिय नीरव मोदीच्या कंपनीमध्ये समभागधारक असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांचे आरोप मुर्खपणाचे आहेत. या बिनबुडाच्या आरोपांसाठी संरक्षणमंत्र्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करु, असा इशारा काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी शनिवारी दिला.

सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत सिंघवी यांच्या पत्नी आणि मुलावर आरोप केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, सिंघवींच्या पत्नी आणि मुलाचे फायरस्टोन डायमंड इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत. ही कंपनी घोटाळेबाज नीरव मोदीच्या मालकीची आहे. या कंपनीत २००२ पासून अनिता संघवी हे अनेकांपैकी एक समभागधारक आहेत. या कोणाच्या पत्नी आहेत हे तुम्हाला ठाऊकच आहे, अशा शब्दांत सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत सिंघवींवर आरोप करताना काँग्रेसवर निशाणा साधला होता.

त्यानंतर सीतारामण यांच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देताना अभिषेक सिंघवी म्हणाले, चुकीचे आणि खोटे आरोप करणाऱ्या सीताराण आणि त्यांच्या सहकार्यांवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी माझे हक्क मी अद्याप राखून ठेवले आहेत. परळमधील अद्वैत होल्डिंग कंपनीची जागा ही जुनी असून यात अनेक वर्षांपूर्वी फायरस्टोन कंपनीने ती भाड्याने घेतली आहे. त्यामुळे अद्वैत आणि मोदीच्या फायरस्टोन कंपनीत माझ्या कुटुंबाचा काहीही रस नाही. परळमधील कमला मिल्समध्ये लागलेल्या आगीनंतर फायरस्टोन कंपनी बंद झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी ताज्या घडामोडीनुसार सीबीआयने पीएनबीच्या ब्रीच कँडी येथील शाखेचा निवृत्त शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणि त्याच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. हेमंत भट्ट आणि मनोज खरात अशी अटक करण्यात आलेल्या इतर दोघांची नावे आहेत. नीरव मोदीचा घोटाळा यूपीएच्या कार्यकाळात म्हणजे २०११ मध्ये सुरु झाला होता असा दावा भाजपाने केला होता. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हा घोटाळा २०१७ ते १८ दरम्यान म्हणजेच एनडीएच्याच कार्यकाळात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या एफआयआरमुळे भाजपाचा दावा फोल ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 5:58 pm

Web Title: on bjp allegations congress warns of legal action
Next Stories
1 चीनशी आमचे चांगले संबंध; देशाचे शिर झुकू देणार नाही : राजनाथ
2 अफगाणिस्तान दहशतवादमुक्त आणि सुरक्षित रहावा ही आमची इच्छा : पंतप्रधान
3 पॉर्न अॅडीक्ट नवऱ्याविरोधात मुंबईतील महिलेची सुप्रीम कोर्टात धाव
Just Now!
X