शनिवारी नवी दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या स्पाइसजेट विमानातून प्रवास करणा्या एका प्रवाशाने विमान हवेत असतानाच आपातकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी विमानातील क्रूने त्याला कसेबसे रोखले आणि विमान सुरक्षितपणे खाली आल्यावर त्याला पोलिसांच्या हवाली केले. फुलपूर येथील स्टेशन हाऊस ऑफिसरच्या म्हणण्यानुसार, हा गोंधळ घालणारा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समजले आहे.

स्पाइसजेटने या घटनेबद्दल एक निवेदन जारी केले आहे की, “२७ मार्च २०२१ रोजी स्पाइस जेट एसजी -२००३ (दिल्ली-वाराणसी) विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमान हवेत असताना आक्रमकपणे विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ”

एअरलाइन्सने सांगितले की, या प्रवाशाला सह प्रवाशांच्या मदतीने विमानातील कर्मचाऱ्यांनी नियंत्रणात आणले. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “क्रूने तातडीने कॅप्टनला माहिती दिली ज्यांनी प्राधान्याने लँडिंगची विनंती केली.”

वाराणसीमध्ये विमान सुरक्षितपणे खाली उतरले, तेथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्पाइसजेटच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या विमानात एकूण ८९ प्रवासी होते. कोणताही अनर्थ किंवा अपघात घडण्यापासून बचावल्यामुळे लोकांना हायसे वाटले.