नवी दिल्लीतील शकरपुर परिसरातील सुंदर ब्लॉक येथे अपहरणकर्त्याच्या तावडीतून आईने आपल्या चार वर्षाच्या मुलीला वाचवलं आहे. या बहादुर आईचा पराक्रम सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. २१ जुलै रोजी भर दुपारी ही घटना घडली. पण एका पराक्रमी आईमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला.

दुपारी साडेतीन वाजता घरासमोर दोन दुचाकीस्वार पोहचले. त्यांनी चेहरा हेल्मेटने झाकला होता. जवळपास अर्धा तास ते दोघेही घरासमोरच उभे ठाकले होते. त्यानंतर पाणी पिण्यासाठी त्यांनी संगीता गुप्ता यांच्या घराची बेल वाजवली. घराचे गेट उघडून संगिता गुप्ता बाहेर आल्यानंतर दोघांनी तिच्याकडे पाण्याची मागणी केली. संगीताने घरातून पाण्याची बाटली आणून दोघांना दिली. त्यादरम्यान संगीताची चार वर्षाची मुलगी गेटवर आली.

मुलगी बाहेर आल्याचं पाहिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी संगीताला आणखी पाणी आणण्यास सांगितलं. संगीता पाण्यासाठी घरात जाताच एकाने मुलीला उचलून गाडीवर बसवलं. मुलीनं लगेच आरडाओरड केली जोरजोरात रडायला सुरूवात केली. मुलीचं रडणं ऐकूण संगीता घरातून पळत बाहेर आली अन् त्या अपहरणकर्त्याशी दोन हात केले. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली.


संगीताचा पराक्रम कॅमेऱ्यात कैद झाला. संगीताला या अपहरणकर्त्याशी लढताना पाहून शेजारी असणारे लोकही सावध झाले. हे पाहून अपहरणकर्त्यांनी पळ काढला. मात्र, सुंदर ब्लॉक येथील रहिवाशांनी शक्कल लढवत रस्त्यावर गाढी आढवी लावून त्या दोन्ही अपहरणकर्त्यांना पकडले. संगीता यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.