देशात आजपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर ३,३५१ सत्रांमध्ये १ लाख ९१ हजार १८१  जणांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. देशातील ११ राज्यांमध्ये सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले.

आसाम, बिहार, हरयाणा, कर्नाटक, ओदिशा, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये नागरिकांना करोना लसीचे डोस देण्यात आले. लसीकरणानंतर कुठल्याही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

मुंबईत कसं झालं लसीकरण?
करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबईत ५० ते ७० टक्के आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी पात्र ठरले. मुंबईत त्यांना लसीचे डोस देण्यात आले. शनिवारी मुंबईत एकूण चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस दिला गेला. मुंबईत कुठल्याही लसीकरण केंद्रावरुन लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट झाल्याचे रिपोर्ट आलेले नाहीत.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांचे यशस्वी लसीकरणाबद्दल कौतुक केले.

राजेश टोपे यांचा पुन्हा तक्रारीचा सूर

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा एकदा मागणीपेक्षा कमी करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केल्याचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राला १७.५० लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे १० लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे” असे राजेश टोपे म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेय.