जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्याच्या प्रस्तावाबाबत नेहमीच आडकाठी आणणाऱ्या चीनने आता यावर नरमाईचे संकेत दिले आहेत. आपल्या नेहमीच्या ताठर भुमिकेच्या विरुद्ध पवित्रा घेत चीनने याप्रकरणावर योग्य मार्गाने तोडगा काढण्यात यावा असे म्हटले आहे.


मात्र, यासाठी चीनने कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चीन दौऱ्यानंतर बरोबर एक दिवसानंतर चीनने ही भुमिका मांडली आहे. यापूर्वी चीनने अनेकदा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अझहरला जागतीक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर वीटो अधिकार वापरत आडकाठी आणली आहे. सुरक्षा परिषदेत चीनने यंदा मार्चमध्ये चौथ्यांदा या प्रस्तावाविरोधात भुमिका घेतली होती. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ‘जैश’चे नाव समोर आल्याने फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने हा प्रस्ताव मांडला होता.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही याप्रकरणी आमची भुमिका स्पष्ट केली आहे. मात्र, आता मी केवळ दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करु इच्छितो ते म्हणजे, यावर सदस्यांचे बहुमत आणि संवादानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. त्याचबरोबर या प्रकरणावर चर्चा सुरु असून प्रगतीही झाली असून यावर योग्य प्रकारे तोडगा काढणे गरजेचे आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत १२६७ अलकायदा प्रतिबंध समिती अंतर्गत अझहरवर बंदीबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी पुन्हा चीनने आपला वीटो हा विशेषाधिकार वापरत याला विरोध केल्यानंतर त्यांच्यावर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने दबाव आणला होता.