”कारगिल युद्धाच्यावेळी इंडियन एअर फोर्सने अत्यंत निर्णायक भूमिका बजावली. एअर फोर्सच्या फायटर विमानांनी शत्रूच्या ठिकाणांवर दिवस-रात्र बॉम्बफेक केली नसती तर युद्ध लांबले असते तसेच आपल्या बाजूला जिवीतहानी देखील वाढली असती,” असे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी एस धनोआ यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले. कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाली. त्यापार्श्वभूमीवर या लढाईतील हवाई दलाची भूमिका आणि कामगिरीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

”आम्ही केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे शत्रूची लढण्याची इच्छाशक्ती संपली. शत्रूचे मनोधैर्य खच्ची झाले होते असे धनोआ म्हणाले. टायगर हिल आणि मुंथो धालोवरील हल्ला या युद्धाचा टर्निंग पॉईंट ठरला,” असे धनोआ यांनी सांगितले. कारगिल युद्धाच्यावेळी धनोआ १७ स्क्वाड्रनचे कमांडींग ऑफिसर होते. त्यांच्याकडे शत्रूच्या ठिकाणांची टेहळणी करण्याची आणि हल्ल्याची जबाबदारी होती.

”रात्रीच्यावेळी डोंगराळ भागातून उड्डाण करताना शत्रूकडून होणार गोळीबार मला दिसत होता. त्यावेळी तणाव असूनही कॉकपीटमध्ये मात्र कुठलाही गोंधळ नव्हता,” अशी आठवण धनोआ यांनी सांगितली. ”कारगिल युद्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये टेहळणी तसेच उंचावरुन अचूक हल्ला करण्याच्या क्षमतेमध्ये आम्हाला काही मर्यादा होत्या. टार्गेटबद्दल आम्हाला नेमकी कल्पना नव्हती,” असेही ते म्हणाले.

”मिग-२५ ने कमी उंचीवरुन उड्डाण करुन टार्गेटची माहिती गोळा केल्यानंतर आम्ही या अडचणीवर मात केली. अचूक हल्ला करण्याची आमची क्षमता मर्यादित होती. शत्रूच्या तळावर अचूक बॉम्बफेक करण्यासाठी त्यावेळी फक्त मिराज २००० विमानांचा पर्याय उपलब्ध होता. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. आमच्या ताफ्यातील सर्व विमानांकडे अचूक हल्ला करण्याची क्षमता आहे. आता दिवस-रात्र हल्ला करण्याबरोबरच टार्गेटला ढगांनी वेढलेले असतानाही अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आमच्यात आहे,” असे धनोआ यांनी सांगितले.