कामगार दिनानिमित्त (१ मे) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सार्वजनिक सुट्टी देखील आहे. मात्र, केरळमध्ये आपल्या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालक टी. जे. थाचनकारी यांनी कामगार दिनानिमित्त बस कंडक्टरची भुमिका साकारली. यावेळी त्यांनी केवळ प्रवाशांना तिकिटेच दिली नाहीत तर तिकीट तपासणीस म्हणूनही त्यांनी काम केले. त्याचबरोबर प्रवाशांकडून त्यांच्या प्रवासादरम्यानच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.


यावेळी थाचनकारी म्हणाले, जोपर्यंत मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही की, माझे कर्मचारी काय काम करतात. तोपर्यंत मी त्यांचे नेतृत्व कसे करु शकतो. कंडक्टर झाल्यामुळे मला प्रवाशांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. यामुळे अधिक चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी आम्हाला मदत मिळेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधाही उपलब्ध करुन देता येतील. यावेळी वाहतूक विभागाच्या संचालकांना आपल्यामध्ये पाहून प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त केले. यावेळी प्रवाशांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या.

आज जगभरात कामगार दिन साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी कामगारांच्या अनिश्चित कामाला ८ तासांच्या कालावधीत रुपांतरीत करण्यात आले होते. या दिवशी देशातील अनेक कंपन्यांना सुटी असते. केवळ भारतातच नव्हे तर जगातील ८० देशांमध्ये या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर केली जाते. गुगलनेही आज आपले डुडल कामगारांना समर्पित केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात १ मे १८८६ रोजी करण्यात आली. चेन्नईच्या लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानने १ मे १९२३ पासून भारतात कामगार दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. त्या काळात हा दिवस मद्रास दिवस म्हणून साजरा केला जात होता.