२२ मार्चला संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सगळ्यांचं कौतुक करा. त्या दिवशी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटे आपल्या घराच्या दरवाजात, दर्शनी भागातील खिडकीत किंवा गॅलरीत तुम्ही या आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचं कौतुक करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. COVID-19 नावाच्या खास टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

सध्या जे सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत त्यांचे कौतुक थाळीनाद, घंटानाद करुन किंवा टाळ्या वाजवून करा असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २२ मार्चला जनता कर्फ्यू हा उत्स्फूर्तपणे पाळण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळात सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत कुणीही बाहेर पडू नये असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एवढंच नाही तर करोनाचं संकट संपलं असं समजून चालणं चुकीचं आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी म्हणजेच ६० ते ६५ वर्षे वयावरील व्यक्तींनी घराबाहेर पडणं टाळावं असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रात्री ८ वाजता मोदींनी देशाला संबोधित केलं त्यामध्ये त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्याचवेळी गेल्या दोन महिन्यांपासून जे आपल्या देशासाठी झटत आहेत त्या अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता पुढे या असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.