इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यातील मिग-२१ विमानांबद्दल वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी एका कार्यक्रमात अजूनही मिग-२१ फायटर विमाने वापरावी लागत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. “इंडियन एअर फोर्सही आजही ४४ वर्ष जुनी मिग-२१ विमाने वापरत आहे. इतकी जुन्या कार कोणीही चालवत नाही ” असे धनोआ म्हणाले. चार दशकापूर्वीची ही फायटर विमाने अजूनही भारतीय हवाई दलाचे महत्वाचे अंग आहे.

सहा महिन्यांपूर्वी डॉगफाइटच्यावेळी पाकिस्तानकडे अत्याधुनिक एफ-१६ विमाने होती. “इंडियन एअर फोर्सही आजही ४४ वर्ष जुनी मिग-२१ विमाने वापरत आहे. इतकी जुन्या कार कोणीही चालवत नाही” हे विधान धनोआ यांनी केले त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांच्या शेजारी बसले होते. इंडियन एअर फोर्सचे स्वदेशीकरण आणि आधुनिकीकरणासंबंधीच्या परिषदेमध्ये ते बोलत होते.

मिग-२१ फायटर विमाने टप्याटप्याने निवृत्त होत आहेत. मिग-२१ विमानांच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य मोठया प्रमाणात भारतात तयार केले जाते. त्यामुळेच हे विमान अजूनही सेवेत आहे. मिग-२१ च्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सुट्टयाभागांचे उत्पादन भारतात केले जाते. रशिया आता मिग-२१ विमानांचा वापर करत नाही. १९७३-७४ साली मिग-२१ विमानांचा एअर फोर्समध्ये समावेश झाला. २००६ साली ११० मिग-२१ विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले. आत ही विमाने मिग-२१ बायसन म्हणून ओळखली जातात. गेल्या काही वर्षात मिग-२१ विमानांचे अनेक अपघात झाले आहेत.