राफेल लढाऊ विमान प्रकरणी काँग्रेस-भाजपात आरोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना याप्रकरणी बचावात्मक नव्हे तर आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. फ्रान्सबरोबर ३६ लढाऊ विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसने भाजपाला चांगलेच घेरले आहे. एनडीए सरकारने यूपीएपेक्षा तीन पट अधिक किमतीने राफेल विमाने खरेदी केल्याचा काँग्रेसने केला आहे.

त्याचबरोबर भाजपा सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवण्यासाठी सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिकल लि. (एचएएल) या व्यवहारातून बाहेर काढल्याचाही काँग्रेसने आरोप केला आहे.

भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत गडकरी म्हणाले, रिलायन्स डिफेन्स डेसॉल्ट एव्हिएशनला काही सुट्या भागांचा पुरवठा करणार आहे. एअरक्राफ्टच्या असेंब्लिंगचे काम नागपूरमध्ये होणार आहे. पुरवठादार कोण असेल याचा निर्णय डेसॉल्टचा असेल. डेसॉल्टचे अनेक आंतरराष्ट्रीय पुरवठादार आहेत. डेसॉल्टला आपला भागीदार नियुक्त करण्याचा अधिकार आहे.

काँग्रेसकडून या व्यवहाराबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. भारत सरकारचे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (डेसॉल्टने निवडलेल्या भारतीय भागीदार निवड प्रक्रियेत) याच्याशी काहीच देणेघेणे नाही. विरोधकांकडून नाहक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ते म्हणाले, आपले सरकार पारदर्शी आहे. त्यामुळे याप्रकरणी आपण बचावात्मक नव्हे तर आक्रमक होण्याची गरज आहे. भारत हे लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी २००२ पासून प्रयत्नात आहे. आपल्याकडे सध्या असलेली लढाऊ विमानांची स्थिती पाहून मला दुख: होते. आतापर्यंत अनेक लढाऊ विमाने कोसळली आहेत. हेलिकॉप्टरची तर अवस्था अत्यंत वाईट आहे. एखाद्या ट्रकमध्ये बसल्यासारखे वाटते. अशा हेलिकॉप्टरमध्ये मोदी हेही प्रवास करतात. उलट मोदी सरकारने केलेला व्यवहार हा यूपीएच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असल्याचा दावाही गडकरींनी केला.