दिल्लीतील वाढत्या धुरक्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली सरकारसोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय धुरकं आणि प्रदुषणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण राहत असलेल्या शहरातल्या वातावरणाची अवस्था पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच व्यथित झाला आहे.  विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिल्लीकरांना प्रदुषणाविरुद्ध एकत्र येत लढण्याचं आवाहन केलं आहे. सध्या दिल्लीत धुरक्यामुळे हवा अतिशय खराब झालेली असून, अनेक नागरिकांना श्वसनाच्या आजारांनी ग्रासलं आहे. काही दिवसांपूर्वी यमुना एक्स्प्रेस महामार्गावर धुरक्यामुळे अंदाजे २०-२५ गाड्यांचा अपघातही झाला होता.

विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत, दिल्लीकरांना जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करायला सांगितलं आहे. शक्य असेल त्या ठिकाणी आपण बस, मेट्रो अशा साधनांनी प्रवास करुया, आपलं छोटसं पाऊल पर्यावरणाचं संतुलन राखण्यात मदत करेल असं म्हणत विराटने दिल्लीकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

अवश्य वाचा – दिल्लीचे कब्रस्तानात रुपांतर होतंय – हरभजन सिंह

काही दिवसांपुर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात, वाढत्या प्रदुषणाच्या आणि धुरक्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक झाली. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकार धुरक्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  प्रयत्न करत आहे. मात्र तोपर्यंत विराट कोहलीच्या आवाहनाला लोकं कशी प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.