उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका ज्येष्ठ मुस्लीम माणसावर प्राणघातक हल्ला करत जबरदस्तीने धार्मिक घोषणाबाजी करायला लावली होती. असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता. या प्रकरणात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.  त्यांनी ट्वीटरवर एक बातमी शेअर करत लिहले की, ” मी हे मानायला तयार नाही की श्रीराम यांचे खरे भक्त असे करु शकतात, अशी क्रौर्यता माणुसकीपासून दूर आहे आणि ती समाज आणि धर्म या दोघांसाठीही लाजिरवाणी आहे.”

गाझियाबाद जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत काही तरुणांनी वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आहे. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. गाझियाबादच्या लोणी येथे ५ जून रोजी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पीडित अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केले, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणावर राहुल गांधी यांनी भाष्य केले.

हेही वाचा – “…माझी हत्या झाली तरी बेहत्तर”, घरावर हल्ला झाल्यानंतर संजय सिंग यांचं भाजपाला जाहीर आव्हान

त्यानंतर सैफी यांनी यासंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला होता. “मी ऑटोरिक्षाने जात होतो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या दोन व्यक्तींनी माझे अपहरण केले. ते मला घेऊन एका जंगलाच्या ठिकाणी गेले आणि मला मारहाण करण्यास सुरवात केली. मी त्यांना सोडण्याची विनंती करत राहिलो. त्यांनी मला वारंवार ‘जय श्री राम’ जप करण्यास सांगितले. त्यांनी माझ्या पाठीवर मारले आणि त्यांनी ‘जय श्री राम’ म्हणायला पाहिजे, असे म्हणायला सांगितले, ”असे सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.