निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. त्यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करुन दाखवली, मतमोजणी रोखण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले तर आमची सुद्धा वकिलांची फौज तयार आहे असे बायडेन यांच्या कॅम्पेन टीमने म्हटले आहे. “राष्ट्राध्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया रोखण्यासाठी कोर्टात गेले, तर आमची सुद्धा कायदेशीर वकिलांची फौज त्यांचा विरोध करण्यासाठी तयार आहे” असे बायडेन यांचे प्रचार व्यवस्थापक जे ओ डिलॉन यांनी स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलंय ट्रम्प यांनी
ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत” असे ट्रम्प व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“आपण दुसऱ्या अन्य राज्यात जिंकतोय हे जाहीर करणार होतो आणि तितक्या हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नाही” असे ट्रम्प म्हणाले.