भारत – पाकिस्तानमधील चर्चेत भारतानेच खोडा घातल्याचा आरोप करत निवडणुका आल्याने मोदी सध्या आक्रमक झाले आहेत असा दावा पाकिस्तानने केला आहे. निवडणुका झाल्यावर मोदी पुन्हा मवाळ होतील असे पाकने म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी भारत आणि मोदींवर आगपाखड केली आहे. अझीझ म्हणाले, आम्ही भारताची दादागिरी खपवून घेणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी पाकविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राशी ते बोलत होते.  मोदी हे स्वतःला अधिनायक म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीत मोदींची प्रचार मोहीम पाकविरोधी भावनांभोवतीच फिरत होती असे अझीझ यांनी सांगितले. भारतात एकदा निवडणुका संपू द्या, मग भारताचा पाकिस्तानसोबतच्या चर्चेबाबतचा दृष्टीकोनही बदलेल असा दावा त्यांनी केला. भारताने काश्मीरमध्ये केलेले मानवी हक्कांचे उल्लंघन सर्वांनी बघितले आहे. विविध संस्थांनीही याविषयीचा अहवाल सादर केल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांमध्ये भारत अडथळे आणत आहे. मोदींना काश्मीर प्रश्नावर चर्चा नको. त्यांना फक्त काश्मीरमधील दहशतवाद दिसतो. सीमा रेषेवरील समस्यांवरुन लक्ष्य वळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहे असे अझीझ यांचे म्हणणे आहे.
काश्मीरवर चर्चा झाल्याशिवाय पाकिस्तान कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही. पाकिस्तान कधीच भारताच्या अधिनायकत्वाला स्वीकारणार नाही. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीमध्ये तडतोड करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानमध्ये अशांतता निर्माण करण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. पाकिस्तानला २०१७ मध्ये अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध निर्माण करायचे आहेत असे त्यांनी म्हटले आहे.