भारतातील माहिती-तंत्रज्ञानाचे क्षेत्र चाळिशीत प्रवेश करीत आहे. पण केवळ हे क्षेत्रच आपल्या चाळिशीत प्रवेश करीत आहे असे नव्हे, तर त्यात काम करणारे सुमारे ३० लाखांचे मनुष्यबळही आता ‘वयस्कर’ झाल्यासारखे भासत आहे. पूर्वी तरुण, सळसळते आणि नुकतेच पदवी शिक्षण करून आलेल्या विद्यार्थ्यांचे क्षेत्र अशी माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची ओळख होती, मात्र आता तीही हळूहळू धूसर होऊ लागली आहे.
    जगावर मंदीचे सावट असताना १०८ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेले हे क्षेत्रही हळूहळू मंदीकडे सरकते आहे की काय, अशीच भीती वाटू लागली आहे.
मध्यमवयीन किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असलेले अनेक जण वेळेवर घरी परतण्यास प्राधान्य देतात. शिवाय याच कारणामुळे शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही त्यांची कामावर येण्याची तयारी नसते, असे निरीक्षण बंगळुरू येथील मेघा जैन या माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने नोंदवले. शिवाय अनेक वर्षांचा अनुभव असल्याने पगाराच्या अपेक्षाही अधिक असतात. त्यामुळे स्वस्त मनुष्यबळ, अधिकाधिक काम करण्याची तयारी असलेले युवक-युवती आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची परकीय चलनातील गुंतवणूक असे तयार झालेले हे समीकरण विस्कटून गेले आहे.
सरासरी वय चढेच..
२०१३ मध्ये इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय २८ होते, मात्र हाच आकडा २००९ मध्ये २६ वर्षे होता. विप्रोमधील ३४.५ टक्के कर्मचारीवर्ग हा ३० ते ५० वर्षे वयोगटातील आहे. सतत तीन वर्षे एकाच कंपनीत कामाला असणे हेही या क्षेत्रातील वैशिष्टय़ मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कंपन्या बदलण्याच्या गतीसही खीळ बसली आहे. एकटय़ा टीसीएसमध्ये तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्यांची संख्या ६१ टक्क्य़ांवर गेली आहे, जी काही वर्षांपूर्वी अवघी ५० टक्के होती. २०१३ मध्ये इन्फोसिसमध्येही १ लाख ५७ हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के मनुष्यबळ तिशीच्या पुढील होते. त्यामुळे या क्षेत्रातील सरासरी वय चढेच असल्याचेही दिसत आहे.

कशी झाली ‘आयटी’ची भरभराट?
कोणे एकेकाळी पहिली नोकरी म्हटली म्हणजे किमान भारतात तरी आपल्या पालकांना सोडून अन्यत्र जाण्याची वेळ येत नसे. मात्र आयटी उद्योगाने हे चित्र बदलले. ही नोकरी म्हणजे बंगळुरू, हैदराबाद किंवा पुणे अशा शहरांमध्ये स्थलांतर आणि फिरती हे प्रकार अनिवार्य ठरू लागले. मात्र यामुळेच, महाविद्यालयीन जीवनातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती खेळू लागणारा पैसा आणि पालकांपासून दूर राहत असल्याने त्यांना मिळणारे ‘स्वातंत्र्य’ हे आयटी उद्योगाचे खरे भांडवल होते. पगाराबरोबर ‘पर्क’ म्हणून मिळणारी चित्रपटांची तिकिटे आणि प्रियकर किंवा प्रेयसीसह उत्तम भोजनाची सुविधा यांच्या माध्यमातून आयटी कंपन्या तरुणांना आकर्षून घेत होत्या.

वाढीच्या दरात घसरण
एकेकाळी सुमारे ३० टक्क्य़ांवर गेलेला वाढीचा दर सध्या १५ ते २० टक्क्य़ांपर्यंत घसरला आहे. शिवाय विद्यमान स्थितीत तो वाढण्याची सुतराम शक्यता नाही. एकीकडे पगाराच्या चढय़ा अपेक्षा आणि दुसरीकडे वाढीचा घसरता दर यांचा तोल राखणे, कौटुंबिक गरजा लक्षात घेत घरूनच काम करण्याची सोय, या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या मुलांच्या पालनपोषणाची सोय अशी अनेक आव्हाने या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसमोर उभी राहिली आहेत.