जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांच्या गस्ती पथकावर पाकिस्तानी सैनिकांकडून अचानक करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील केरन भागात बुधवारी ही चकमक झाली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या कृत्याला सडेतोड उत्तर दिल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


आज सकाळी नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारात हा जवान जखमी झाला होता. त्याला एअरलिफ्ट करुन श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, आजच सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या घुसखोरीचा डाव उधळला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला. त्यांच्याकडे पाकिस्तानी सिम कार्ड आणि पाकिस्तानी चलनी नोटा सापडल्या आहेत.