नोटाबंदीच्या घोषणेनंतर सुरू झालेले मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नोटाबंदीच्या १३ व्या दिवशीही बँकांच्या बाहेर जुन्या नोटा जमा करण्यासाठी व बदलण्यासाठी मोठी गर्दी दिसून येते. उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील स्टेट बँकेच्या एका शाखेत सोमवारी सकाळी पैसे काढण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका ६५ वर्षीय रामनाथ कुशवाहा या वृद्धाचा मृत्यू झाला.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बँक उघडण्यापूर्वीच येथे मोठी गर्दी झाली होती. शनिवार आणि रविवारी पैसे काढता न आल्यामुळे लोकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी येथे सुमारे एक हजार लोक बँकेच्या बाहेर रांगेत उभे होते, असे सांगितले. सकाळी दहा वाजता बँक उघडताच काऊंटरवर येण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ६५ वर्षीय रामनाथ यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली व गर्दीवर नियंत्रण मिळवले.
रामनाथ यांची सूनेची रविवारीच जिल्हा रूग्णालयात प्रसुती झाली होती. त्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी सकाळी सात वाजताच ते बँकेत पोहोचले होते. बँकेचे व्यवस्थापक विजय बहादूर सिंह यांनी गर्दी उसळल्याने ही घटना घडल्याचे सांगितले. पोलिसांच्या उपस्थित पुन्हा बँकेचे कार्य सुरळितरित्या सुरू झाले.