हैदराबाद येथील नानकरामगुडा येथील बांधकाम सुरू असलेली एक सातमजली इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. अजूनही १० ते १२ लोक ढिगाऱ्याखाली फसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रात्रीपासून पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान ढिगारे दूर करण्याचे काम करत आहेत. त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचेही सहाय्य लाभत आहे. हैदराबादचे महापौर बी. राममोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या परिसरात सुमारे १० कुटुंबे राहत होती. यातील बहुतांश मजूर लोक आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दोन व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. एक मृतदेह रात्रीच बाहेर काढण्यात आला. सकाळच्या सुमारास बचाव पथकाच्या हाती आणखी एक मृतदेह लागला. एका मुलासह दोघा जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलंगणाचे गृहमंत्री एन. नरसिंहा रेड्डी आणि इतर मंत्र्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

इमारत तयार करताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा संशय गृहमंत्री रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचे आयुक्त बी. जनार्दन रेड्डी यांनी इमारत कोसळण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे म्हटले आहे.